उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार!; कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई |  कोरोनासंदर्भातील शासननिर्णयाची प्रत मनसेला न मिळाल्याने मनसे नेते कीर्तीकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार!, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये ह्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांना ह्या शासन आदेशाद्वारे काही निर्देश- सूचना देण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयाची प्रत भारतीय जनता पार्टी, इंडियन नॅशनल काॅंग्रेस, नॅशनलिस्ट काॅंग्रेस पार्टी, शिवसेना ह्या पक्षांना पाठवण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पार्टी तसंच बहुजन समाज पार्टी ह्या पक्षांनाही पाठवण्यात आली आहे. मात्र मनसेला पाठवण्यात आलेली नाहीये. याकडे मनसेने लक्ष वेधलं आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि बहुजन समाज पार्टी ह्यांचा एकही निवडून आलेला प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळात नाही. ह्याउलट एमआयएम, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी पक्ष, शेकाप, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, जनसुराज्य शक्ती आणि अर्थातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षांकडून निवडून आलेले लोकप्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळात असतानाही ह्या राजकीय पक्षांना शासन निर्णयाची अधिकृत प्रत पाठवण्याची तसदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या अखत्यारितील सामान्य प्रशासन विभागाला घ्यावीशी वाटत नाही हे निश्चितच शोभनीय नाही, असं मनसेने म्हटलं आहे.

एका राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांनी नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अनुल्लेखाने मारण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. आता मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तोच प्रकार सुरू आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शासन आदेशाची प्रत का पाठवण्यात आली नाही, हे समजायला काहीच मार्ग नाही! कदाचित मुख्यमंत्र्यांना आणि ह्या खात्याच्या सचिवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लाखो महाराष्ट्र सैनिक कोरोनाबाबतच्या जनजागृतीबाबत उत्तम काम करत आहेत, ह्याकडे डोळेझाक करायची असावी, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या”

-मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका- मुख्यमंत्री

-राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 49वर; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

-बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला

-“आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकलं जात नाही”