पुणे महाराष्ट्र

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्सच्या मॅनेजरला चोपलं

पुणे : चढ्या दरानं खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या पीव्हीआरच्या मॅनेजरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील पीव्हीआरमध्ये हा प्रकार घडला.

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ चढ्या दराने विकले जातात. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 

मल्टिप्लेक्समध्ये एवढ्या चढ्या दरानं खाद्यपदार्थ का विकले जातात? राज्य सरकारचं या दरांवर नियंत्रण का नाही? लोकांना बाहेरुन खाद्यपदार्थ नेण्यास का मज्जाव केला जातो? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले होते. 

दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीच्या बातम्या समोर येताच या प्रकाराबद्दल लोकांमध्ये रोष तयार झाला आहे. मनसेने हा मुद्दा हाती घेतला असून मल्टिप्लेक्सना इशारा दिला आहे. 

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील पीव्हीआरमध्ये काही मनसे कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आंदोलन केलं. तसेच येथील मॅनेजरला धारेवर धरलं. बाचाबाची झाल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरच्या कानाखाली दिली. त्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलंच तापलं होतं.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर तातडीने कमी करा, अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा मनसेने दिला आहे.