पुणे | अजून किती दिवस या जीवघेण्या लॉकऊनमध्ये रहायचं? कधी जाणार कोरोना? कोरोनावर कधी लस येणार? असे अनेक प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात हैदौस घालत आहेत. मात्र दुसरीकडे आता कोरोनासोबत जगण्याची तयारी ठेवावी लागेल, असं मत देखील आता पुढे येऊ लागले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल, असं मत मांडत एक लेख लिहिला आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणतात…
“खासगी कंपनीतील नोकरदारांपासून छोटे व्यावसायिक,दुकानदार,स्टार्टअपची सुरुवात केलेल्यांपर्यंत अनेक घटक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वर्ष वाया जाण्याच्या भीतीनं नैराश्याची भावना आहे. गेल्या तीन महिन्यातील देशातील एकूण परिस्थितीचा विचार केल्यास कोरोनाची आपल्याबरोबर राहण्याची तयारी असो वा नसो, आपल्याला उपचार किंवा लस मिळेपर्यंत आणि ती सर्वांना उपलब्ध होईपर्यंत कोरोनाबरोबर राहावं लागेल. हे शक्य आहे, परंतु ती एक जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यावे. त्यासाठी भीती आणि बेफिकीरी यांच्यातील सुवर्णमध्ये गाठावा लागेल.”
“आपल्या देशात ३० जानेवारी २०२० ला कोरोनाचा शिरकाव झाला. अनेक दिवस या प्रादुर्भावाचं गांर्भीय लक्षात न घेता आपण तापमान, बीसीजी लस आणि ‘मर्स’, ‘सार्स’ या आजारांच्या पूर्वानुभवामुळं गाफिल राहिलो. पण, त्यानंतर आपणही सर्वत्र अवंलबलेला लॉकडाउनचा पर्याय निवडला. लॉकडाउनची वेळ, त्याची अंमलबजावणी, परिणामकारकता या गोष्टींवर वैज्ञानिक आणि राजकीय मतमतांतरं आहेतच. परंतु, त्यावर चर्चा करत दोषारोप करण्याची ही वेळ नाही. त्याचवेळी वस्तुस्थितीकडं डोळेझाक करून चालणार नाही. जागतिक अहवालांनुसार लॉकडाउनमुळं कोरोनाचा गुणाकार रोखण्यात यश आलं असलं, तरी २४ मार्चला लॉकडाउन सुरू होताना देशात कोरोनाचे केवळ ५३६ रुग्ण होते, आज ही संख्या सव्वा दोन लाखांच्या पुढं गेली आहे. परिस्थिती अजूनही नियंत्रणात येण्याची चिन्हं नाहीत. इतकंच नाही, तर काही घटकांमध्ये लॉकडाउनबाबत ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी भावना निर्माण झाली आहे. जवळपास सव्वा दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर सर्वसामान्यांचा संयम सुटत असताना पुढं काय, हा प्रश्न आ वासून उभा आहे.”
“या सर्व परिस्थितीकडं पाहताना एक प्रश्न मनात येतो – सुरवातीला आपण राणा भीमदेवी थाटात कोरोनाला हरविण्याची भाषा केली, त्याची साखळी तोडण्याचाही प्रयत्न केला. टाळ्या, थाळ्या वाजविणं, दिवे लावणं, पुष्पवृष्टी अशा ‘व्हेंट्स’मध्येही सहभागी झालो. पण, हे सर्व करताना आपण संकटाचं स्वरुप आणि त्याची व्याप्ती याचा शास्त्रोक्त अंदाज घेऊन योग्य ती रणनीती ठरविण्यात कमी पडलो का? या प्रश्नाचं उत्तर काहीअंशी होकारार्थी असल्यास इथून पुढं आपली रणनीती काय असावी, आपल्यासमोर काय पर्याय उपलब्ध आहेत, याचा नीरक्षीरविवेकबुद्धीनं विचार करणं जास्त संयुक्तिक ठरतं.”
“जगातील अनेक देशांप्रमाणं आपण लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला तेव्हा तो अंतिम पर्याय नाही, तर आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासाठी पुरेसा अवधी मिळवणं, हे मुख्य उद्दिष्ट होतं. संसर्ग झालेल्या रुग्णांमधील मृत्यूदआटोक्यात आणणंर , त्यासाठी उपचारपद्धती विकसित करणं, हाही एक महत्त्वाचा पैलू होता. गेल्या अडीच महिन्यांतील कामगिरीचं अवलोकन केलं, तर मृत्यूदर कमी करण्यात आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं आहे.(त्यातही जाणीवपूर्वक, अनावधनानं किंवा तपासणीअभावी अंडररिपोर्टिंगची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.) मात्र, रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असून शहरांतून ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर, आयुर्वेदासारखी महान देणगी असताना तसेच आयुर्वेदाबरोबरच ×लोपॅथी, होमिओपॅथी, युनानी या शाखांचा वापरू करून समग्र (Integrated) उपचारपद्धती विकसित करण्यात आलेलं अपयशही नाकारून चालणार नाही. अजूनही कोरोनावरील उपचार किंवा लशीवर संशोधन सुरू आहे. आणखी तीनचार महिने तरी या गोष्टी प्रत्यक्षात येण्याची चिन्हं नाहीत. आणखी तीनचार महिने लॉकडाउनमध्ये राहण्याची कल्पनाही व्यवहार्य वाटत नाही. टाळेबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या वर्गाची परवड उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे. मोजक्या श्रीमंत वर्गासाठी काही महिन्यांचं नुकसान, रद्द झालले सुट्टयांचे बेत आणि घरात बसण्याचा कंटाळा यापलीकडं मोठी झळ अजून बसलेली नाही. पण, यात आता निमूटपणे भरडला जाऊ लागलायं, तो मध्यमवर्ग. कारण, सरकार, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी हातावर पोट असलेल्या वर्गासाठी काही ना काही मदतीचा हात पुढं केला आहे.”
“लॉकडाउनचा सुरुवातीलचा ‘रोमॅंटिसिझम’ ओसरल्यानंतर भविष्याचा प्रश्न मध्यमवर्गीयांपुढं आ वासून उभा राहिलाय. यात खासगी कंपनीतील नोकरदारांपासून छोटे व्यावसायिक, दुकानदार, स्टार्टअपची सुरुवात केलेल्यांपर्यंत अनेक घटक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वर्ष वाया जाण्याच्या भीतीनं नैराश्याची भावना आहे. मध्यमवर्गीयांना गृहकर्ज, वाहनकर्जाचे हप्ते, मुलांचं सुरू होणारं शैक्षणिक वर्ष आदींची चिंता भेडसावते. इतकंच नाही, तर उद्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळं नोकरीवर येऊ शकणारं गंडांतर, वेतनकपात असे अनेक प्रश्न मध्यमवर्गीयांच्या मनात फेर धरू लागलेत. कदाचित यामुळेही असेल, पण सुरवातीला कोरोनाला हरविण्याची भाषा करणाऱ्यांच्या तोंडीही आता कोरोनाबरोबर जगावं लागेल, अशी भाषा येऊ लागलीय.”
“त्याचबरोबर, हाही मतप्रवाह जोर धरू लागला आहे की, क्षयरोग, एड्स, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांबरोबर आपण जगतोच आहोत, त्यात कोरोनाची आणखी एक भर! पण हे खरंच शक्य आहे का? हे बोलण्याएवढं सोप्पं आहे का? होय, देशातील एकूण परिस्थितीचा विचार केल्यास कोरोनाची आपल्याबरोबर राहण्याची तयारी असो वा नसो, आपल्याला उपचार किंवा लस मिळेपर्यंत आणि ती सर्वांना उपलब्ध होईपर्यंत कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल. ही तयार करताना ‘काय होणार आहे,’ ही बेफिकिरी आणि ‘कोरोनाची लागण झाली तर,’ ही भीती या दोन्हींचा सुवर्णमध्य काढून सावधपणानं पावलं टाकण्याची गरज आहे. कोरोनासोबत राहणं शक्य आहे, परंतु ती एक जबाबदारी आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं. ही जबाबदारी, वैयक्तिक, सामूहिक आणि शासकीय पातळीवर विभागता येईल.”
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चाललीये; राजनाथ सिंह महाविकास आघाडीवर बरसले
-‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिसात दाखल, इथं आहे नेमणूक!
-कोकणच्या मदतीला भाजपा, 14 ट्रक मदतसामुग्री रवाना- देवेंद्र फडणवीस
-भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं; चंद्रकांतदादांचा निशाणा
-पुण्यात आज 166 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…