कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. खासदार संभाजीराजेंनी त्यांच्या वाट्याच्या निधीतून मदत जाहीर केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करून याबाबत माहिती दिली. महापूरामध्ये बरीच गावं उद्धस्त झाली आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरवणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या निधीतून 5 कोटी रुपये या गावात खर्च करण्याचा संकल्प केला आहे, असं त्यांनी सांगितलं.
मला कल्पना आहे की, झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात हा निधी खूप कमी आहे. पण ही एक सुरुवात आहे. शिव-शाहू विचारांच्यासाठी आणि समाजसेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
कोल्हापूर शहर आणि आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावांतील पाणी ओसरत असलं तरी शिरोळ तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. विशाखापट्टणम येथून 13 बोटी मागवण्यात आल्या असून त्याही शिरोळला देणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
सैनिक टाकळी, दत्तवाडी, राजापूर येथील पूरपरिस्थिती फारच गंभीर आहे. राजापूरवाडी गावाचा संपर्क तुटला आहे. संपूर्ण गाव एका मंदिरात आहे. या गावात आम्ही पोहोचलो असता त्याही परिस्थितीत सर्व ग्रामस्थांनी आम्हाला चहा करुन दिला. त्यांचं छत्रपती घराण्यावर असलेले प्रेम व निष्ठा पाहून मला काम करण्यास दहा हत्तीचे बळ मिळतं, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.
दत्त शिरोळ कारखान्यामध्ये अनेक गावातील ग्रामस्थांना स्थलांतरित केलं आहे. त्यांना भेटून संभाजाराजेंनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पूरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले आहेत, घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या सर्वांना घर बांधून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांंची लवकरच भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली परिसरातील सर्व पिकंही नष्ट झाली आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं त्यांचं कर्ज माफ करुन, बिनव्याजी मदत सरकारकडून मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना राज्य तसेच इतर राज्यातूनही मदत कार्य सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये कोणी आणलं???; मुफ्ती-ओमर अब्दुल्ला यांच्यात शाब्दिक चकमक
-पवार-महाजन वाद भडकला; आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरवर लघुशंका
-रोहित शर्माकडून रिषभ पंतचं नामकरण; ठेवलं हे विनोदी नाव…
-पाक लष्कराला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा का?; इम्रान खान यांचा सवाल
-माजी खासदार चंद्रकांत खैरेंची आता नवी भविष्यवाणी