“MPSC विरुद्ध सोशल मीडियावर लिहाल तर…”, आयोगाचा उमेदवारांना थेट इशारा

मुंबई | राज्यात सध्या पदभरतीचा अभुतपूर्व गोंधळ चालू आहे. आरोग्य भरती, म्हाडा भरती, टीईटी भरती, या शासकीय भरतीतील भ्रष्टाचार सध्या गाजत आहे. अशातच आता एमपीएससीनं एक परिपत्रक जारी केलं ज्यावरून जोरादार वाद पेटला आहे.

राज्यसेवा पुर्व परीक्षा ही 2 जानेवारी रोजी नियोजित होती. सरकारनं नुकताच एक बदल करत कोरोनाच्या काळात ज्यांचं वयोमर्यादा संपली होती अशा उमेदवारांसाठी एक संधी दिली आहे. या निर्णयानं ही परीक्षा पुढं ढकलल्याचं सांगण्यात आलं.

परीक्षा पुढं ढकलल्यानं परिक्षार्थींचा मोठा विरोध आयोगाला सहन करावा लागला आहे. विद्यार्थ्यांनी आयोगावर जोरादार टीका केली आहे. परिणामी आता आयोगानं टीकाकारांना उत्तर देताना कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत अथवा निर्णय न घेण्याबाबत कोणत्याही प्रकारे प्रयत्न केल्यास अशी कृती आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल व अशा प्रकरणाबाबत आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल, असं आयोगानं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आणि काही निर्णयांविषयी नाराजी असणाऱ्या, तसेच आयोगाच्या काही निर्णयांमुळे प्रभावित होणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या कार्यपद्धती आणि निर्णयांवर जाहीर टीका-टिप्पणी करण्यात येते, असं आयोगानं म्हटलं आहे.

तरीही आयोगावर टीका-टिप्पणी करत असताना शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या भावी लोकसेवकांकडून सार्वजनिक सभ्यतेचे भान ठेवून संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर केला जाणे अपेक्षित आहे, असा सल्ला आयोगानं दिला आहे.

काही उमेदवार किंवा व्यक्ती यांच्याकडून विविध प्रसारमाध्यमे अथवा समाजमाध्यमे यावर मत किंवा अभिप्राय व्यक्त करताना किंवा दूरध्वनीवरुन संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करण्यात येत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने लक्षात आली आहे, असंही आयोगानं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

उमेदवारांकडून, व्यक्तींकडून, संघटनांकडून असला प्रकार घडला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. उमेदवारांकडून अथवा विद्यार्थ्यांकडून अयोग्य प्रकारचं वर्तन दिसल तर त्यांच्यावर आयोग बंदीची कारवाई सुद्धा करू शकतं, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एमपीएससी आयोगानं जारी केलेल्या या पत्रकावर जोरदार टीका करण्यात येत आहे. आधी परीक्षा निट घ्या नंतर कारवाई करण्याचा विचार करा, अशी टीका एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

पाहा ट्विट –

महत्त्वाच्या बातम्या- 

 कोरोनाचा पुन्हा विस्फोट! ‘या’ ठिकाणी सापडतात दर सेकंदाला दोन रूग्ण

पार्थ पवार म्हणतात,”आत्या तुम्ही काळजी घ्या, तुम्ही दोघं लवकरच…”

पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा गौप्यस्फोट, आता अजित पवार म्हणाले…

“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा