अहमदनगरमधील देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपल्या एका कृतीने एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. केरळमध्ये पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला असताना मदतीची गरज आहे. जगभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जातोय. नगरच्या देहविक्री करणाऱ्या महिलांनी देखील केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली आहे.
देहविक्री करणाऱ्या महिला म्हटलं की त्यांच्याकडे समाज तुच्छतेने पाहतो. आज केरळला मदतीची गरज असताना या समाजातील किती लोकांनी मदत केली माहीत नाही, मात्र देहविक्री करणाऱ्या महिलांनी मात्र आपल्या कमाईतील हिस्सा केरळच्या पूरग्रस्तांना दिला आहे. आपल्या एका दिवसाची सगळी कमाई त्यांनी पूरग्रस्तांना देऊ केलीय. ही रक्कम 21 हजार रुपये इतकी आहे.
केरळमध्ये गेल्या 100 वर्षातील सर्वात भयंकर पूर आला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो कुटुंबं रस्त्यावर आली आहे. या कुटुंबांना सावरण्यासाठी मदतीची गरज आहे. सरकार मदत करतच आहे, मात्र हा भार आणखी करण्यासाठी तुमच्या आमच्या मदतीची त्यांना गरज आहे.
नगरमधील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या या मदतीचं सगळीकडून चांगलंच कौतुक होतंय. या महिलाच नव्हे तर एकेकाळची पोर्नस्टार सनी लिओनीने देखील केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय. तिने एक-दोन नव्हे तर तब्बल 5 कोटी रुपये केरळच्या पूरग्रस्तांना देऊ केले आहेत.