मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात ऐकणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडवणारी घटना

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रीपदाचा कार्यभार आहे. आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी तो स्वतःकडे घेऊन ठेवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला खरंतर स्वतंत्र गृहमंत्री असायला हवा. विरोधकांसह भाजप नेत्यांनी देखील ही मागणी केली आहे, मात्र गृहमंत्रीपद आपल्या हातात ठेवण्याला मुख्यमंत्र्यांना स्वारस्य आहे. मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपदामध्ये स्वारस्य असलं तरी त्यांची गृहखात्यावर पकड आहे की नाही? असे प्रश्न अधूनमधून निर्माण होत असतात. त्याला काही घटना कारणीभूत असतात. आता पुन्हा एकदा हा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. त्याला कारणीभूत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंडवरील एक धक्कादायक घटना. ही घटना ऐकणाऱ्याच्या अंगावर शहारे येतील, अंगाचा थरकाप उडेल इतकी ही घटना भयावह आहे.

नक्की काय घडलं नागपुरात?

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एका रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. नुसतीच हत्याच करण्यात आली नाही तर त्यानंतर त्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली. रिक्षा चालकांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेतून ही हत्या झाल्याचं कळतंय. सर्वसामान्य नागपूरकरांसाठी मात्र ही प्रचंड मोठा धक्का देणारी त्यांच्या मनात दहशत निर्माण करणारी बातमी आहे. नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही?, असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.

कुठं आणि नेमकं काय घडलं?

नागपूरच्या नंदनवन परिसरातील खरबी रोडवर माल वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाची इतर 2 रिक्षा चालकांनी हत्या केली. राजेंद्र देशमुख असं मृत रिक्षा चालकाचं नाव आहे. गोलू ठाकरे आणि एजाज अनिस शेख अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.

गोलू ठाकरे आणि एजाज अनिस शेख या आरोपींशी रिक्षा चालक राजेंद्र देशमुख यांचा जुना वाद होता. याच वादातून त्यांनी राजेंद्र देशमुख यांची हत्या केल्याचं कळतंय. दोन्ही आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी देशमुख यांचा मृतदेह रिक्षात टाकून खराबी परिसरात आणला. या भागावर आपलं वर्चस्व राहील हे दाखवून देण्यासाठी त्यांनी राजेंद्र देशमुख यांच्या मृतदेहाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दोघांनी मृतदेहाची अक्षरश: विटंबना केली. माणुसकीला कलंक लावणारा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे.

आरोपी फरार, पोलीस घेत आहेत शोध-

राजेंद्र देशमुख यांची हत्या करणारे दोन्ही आरोपी सध्या फरार झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही आणि इतर गोष्टींच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. 

आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश येईल मात्र महाराष्ट्राच्या उपराजधानीत घडणाऱ्या अशा घटनांमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का?, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.