राम मंदिरापेक्षा गरिबाला दोन घास मिळणं महत्त्वाचं- नाना पाटेकर

पुणे : अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यानंतर एक वादळ उभं राहिलं होतं. #MeToo चं वारं यानंतरच सुरु झालं आणि संपूर्ण सिनेसृष्टी हादरुन गेली. नुकताच कुठे या वादाचा धुरळा खाली बसला आहे. मात्र आता पुण्यातील कार्यक्रमात नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या वादात सापडलं आहे. कुणी याप्रकरणी नाना पाटेकर यांची बाजू घेत आहे तर कुणी या प्रकरणी नाना पाटेकर यांच्यावर टीका करत आहे. 

कोणत्या कार्यक्रमात सहभागी झाले होते नाना?

राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या आणि ग्रीन थंब या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. हे या कामाच्या चौथ्या टप्प्याचं उद्घाटन होतं. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उदघाटन झालं. यावेळी नाम फाऊंडेशनकडून पाच पोकलेन या उपक्रमासाठी देण्यात आले.

नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले?

आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा होत नाही, असा प्रश्न नाना पाटेकर यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला नाना पाटेकर यांनी जे उत्तर दिलं तेच वादात सापडलं आहे.

“कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज जर दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटतात. त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधायचे असेल तर बांधा, पण मला मात्र जे काम करायचे आहे मी करत आहे- नाना पाटेकर

 

शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले नाना?

यंदा महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाईलाजाने गावाकडील लोक आज शहराकडे येत आहेत. ते काही भिकारी नाहीत. त्यामुळे त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका, असं आवाहन नाना पाटेकर यांनी यावेळी केलं. दिल्लीत शेतकरी मोर्चा निघाला होता. हे पाहता सामाजिक संस्थांनी शेतकऱ्यांना मदत करावी. कोणतेही सरकार शेतकऱ्यांना मदत करते, मात्र ती मदत कमी पडते. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करायला हवी, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.