वाढदिवस स्पेशल | नरेंद्र मोदींसोबत पंगा घेणारा माणूस; काय घडला होता नेमका प्रकार?

राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आज (ता. ५ जून) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तो किस्सा जो राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजवणारा ठरला होता.

काँग्रेसमधूनच भाजपमध्ये केला होता प्रवेश-

नाना पटोले वास्तविक काँग्रेस नेते होते. २००८ साली त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वावर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २००९ साली त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली मात्र ते निवडून येऊ शकले नाहीत. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ साली झालेली विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवली आणि साकोली विधानसभा क्षेत्रातून ते निवडून आले. २०१४ साली भाजपनं त्यांना भंडारा-गोंदियातून लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी तब्बल १ लाख ४९ हजार मतांनी पराभव केला.

Nana Patole 1

थेट पंतप्रधान मोदींसोबत घेतला पंगा-

नरेंद्र मोदी २०१४ साली देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर पक्षाची पूर्ण सूत्रं मोदी-शहा जोडीकडे गेली, त्यानंतर मोदींचा शब्द भाजपमध्ये अंतिम मानला जाऊ लागला. ज्येष्ठ नेते निर्णयप्रक्रियेतून बाजूला फेकले गेले. नरेंद्र मोदींवर एकाधिकारशाहीचा आरोप होऊ लागला होता, अशात एका मिटिंगमध्ये झालेल्या प्रकारावर नाराज होऊन नाना पटोले यांनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. यासंदर्भात घडलेला प्रकार खुद्द नाना पटोले यांनीच प्रसारमाध्यमांना सांगितला आहे.

मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नाना पटोले यांनी ओबीसी तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना नरेंद्र मोदी यांनी अपमानास्पदरित्या खाली बसवलं. नाना पटोले सांगतात, की “माझ्या आधी  प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याचाही नरेंद्र मोदी यांनी असाच अपमान करत त्यांना खाली बसवलं होतं.”

Nana Patole1

भाजप सोडताना नाना पटोले काय म्हणाले?

“देशातील सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी साेडवण्यात अपयशी ठरले आहे. मी इथे खुर्च्या उबवायला आलेलो नाही. जनतेची कामंच होत नसतील तर पदावर राहण्यात काय अर्थ? सरकार ऐकत नसेल तर साेबत राहून काम करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा पुन्हा जनतेत जाऊन काम केले पाहिजे, असे मला वाटले म्हणून मी राजीनामा दिला. सरकार आपले असले म्हणून त्यांच्या चुकीच्या निर्णयाचे मी कदापि समर्थन करणार नाही. मी जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालोय, कुण्या नेत्याच्या उपकाराने नाही”

Nana patole and cm

“फडणवीस लोकांच्या वैयक्तिक जीवनात लक्ष घालतात-“

देवेंद्र फडणवीस जवळच्याच व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात लक्ष घालतात. राजकारणात काेणीही काेणाच्या वैयक्तिक बाबीत लक्ष देऊ नये, त्यांनी या पद्धतीने किमान माझ्या तरी वाटे जाऊ नये. एवढीच माझी त्यांना सूचना आहे, असंही यावेळी नाना पटोले म्हणाले होते.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर….

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नाना पटोले यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी गुजरातमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला हजेरी लावली आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. त्यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारानं विजय मिळवला. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले काँग्रेसकडून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले.

Nana Patole

महाविकास आघाडीत महत्त्वाची जबाबदारी-

थेट नरेंद्र मोदींसोबत पंगा घेतल्यानं नाना पटोले यांना काँग्रेसमध्ये मानाचं स्थान मिळालं, ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीचं सरकार विराजमान झालं. या सरकारमध्ये नाना पटोले यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. ते सध्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.

Nana Patole Prithviraj Chavan

बनू शकतात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष!-

कोरोनाचा प्रकोप सुरु असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी सुरु असल्याचं चित्र आहे. काँग्रेसअंतर्गत काही फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या आठवड्यात रंगली होती. तूर्तास ही चर्चा थंडावली असली तरी काँग्रेसमध्ये खांदेपाटल होणार असल्याचं राजकीय घडामोडींचे जाणकार सांगतात. विधानसभेचं अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता असून नाना पटोले यांना काँग्रेसचं प्रदेशध्यपद मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-RTI अंतर्गत PM केअर फंडाबाबत विचारले होते प्रश्न; PM कार्यालयाने उत्तरं दिली नाहीत!

-लोकांचा अंत सरकारने पाहू नये, वीस लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी- प्रकाश आंबेडकर

-नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रोरो बोटीतून आलिबागकडे रवाना

-पुणे जिल्ह्यातील पंचनामे लगोलग पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

-उद्धव ठाकरेंनी नेतृत्व कसं करायचं असतं हे दाखवून दिलं- बाळासाहेब थोरात