“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. काल ते वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती मिळतेय. अशावेळी मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत अजित पवारांकडे चार्ज देण्याची मागणी केली जात होती. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.

गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्यच विकून मोकळं होतील, अशी टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी परीक्षा घोटाळ्यांवरूनही ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.  राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत. हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

घोटाळ्यात तुमची एवढी लोक यात सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार?, असा सवाल करत पडळकरांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआय चौकशी केली, तर बिघडलं कुठं, तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली, करू द्या ना सीबीआय चौकशी, अशी मागणीही पडळकरांनी केली आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी या मुद्द्यावरुन रान उठवायला सुरु केली आहे.

मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार नसतील तर कसं होणार?, असा प्रश्न भाजपचे नेते विचारत आहेत. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत.

उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे त्यांनी गैरहजर असणं स्वाभाविक आहे. त्यांचे आजारपण हे चिंताजनक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार तुर्तास दुसऱ्या कोणाकडे तरी सांभाळायला द्यावा, अशी मागणी पहिल्यांदा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

विरोधकांच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी, म्हणाले… 

“मोदींच्या विचारांची उंची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये येणं कधी शक्यच नाही” 

भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा; देवेंद्र फडणवीस संतापले 

पेपरफुटीच्या चौकशीसाठी वेळ मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले… 

“उद्धव ठाकरेंनी या वयात हट्ट करू नये, कोणाला तरी चार्ज द्यावा”