मुंबई | राज्य विधीमंडळाचं अधिवेशन मोठ्या गदारोळात मुंबईमध्ये पार पडत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार कलगीतूरा रंगला आहे.
राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. परिणामी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टोकाची टीका करत आहेत. अशात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली. अन् राज्यात राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. भाजप सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या मागण्यांकड लक्ष दिलं गेलं नाही, अशी टीका काॅंग्रेसनं केली आहे.
भाजपनं ओबीसींविरुद्ध केलेल्या पापामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गंडांतर येऊन आज ओबीसींच्या जागा ओपनमधून लढल्या जात आहेत. मात्र काँग्रेस पक्ष ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
येत्या निवडणुकीमध्ये ज्या जागा ओबीसींच्या होत्या तेथे ओबीसी उमेदवार देण्याचं काम काँग्रेस करेल, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. परिणामी आता इतर पक्षांच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
राज्यात येत्या काळात नगरपंचायतींच्या ओबीसी आरक्षणाच्या रिक्त जागांवर पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. परिणामी आत्तापासूनच या निवडणुकीच्या रणनितीवर सर्व पक्ष भर देत आहेत.
राज्यात काही दिवसांपूर्वीच 105 नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगानं जानेवारी महिन्यामध्ये ओबीसींच्या जागांवर निवडणूक घेण्याची घोषणा केली होती.
आत्ता झालेल्या निवडणुकीच्या मतदानाची आणि 18 तारखेच्या मतदानाची मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे, असं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस मदान यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, नाना पटोले यांच्या भाजपवरील टीकेनंतर आता राज्यातील भाजप नेते नानांना काय उत्तर देतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात राजकीय संघर्षाला कारणीभूत ठरणार हे मात्र नक्की.
महत्त्वाच्या बातम्या-
“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”
मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”
‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर