पुणे: पुण्यातील नांदेड सिटीसह (Nanded City, Pune) परिसरातील नागरिकांनो, सतर्क राहा! कारण पोटदुखी आणि पोटाशी संबंधित आजारांनी परिसरात डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेड सिटी, नांदेड गाव, किरकिटवाडी, शिवणे, कोंढवे-धावडे, धायरी, डीएसके विश्व, सिंहगड रोड आणि उत्तरनगर भागात पोटदुखीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विविध वयोगटातील लोकांना या आजाराची लागण होत असून, वेळेवर उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर वळण घेऊ शकते.
चिंतेची बाब म्हणजे अनेक जण सुरुवातीला पोटदुखीकडे दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे त्रास आणखी बळावत आहे. या पार्श्वभूमीवर, नांदेड सिटी येथील कोरडेबागमधील वर्पे क्लिनिकच्या डॉ. अश्विनी पाटील-वर्पे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “बाहेरचे पदार्थ खाताना काळजी घ्या, पोटदुखी किंवा इतर कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा,” असे आवाहन डॉ. अश्विनी पाटील-वर्पे यांनी केले आहे.
पोटदुखीच्या साथीमागे अनेक कारणे असू शकतात. अशुद्ध पाणी हे पोटदुखीचे प्रमुख कारण ठरू शकते. पाण्यावाटे होणारा जंतूसंसर्ग जुलाब, उलट्या आणि पोटदुखीला आमंत्रण देतो. तसेच, उघड्यावरचे, अस्वच्छ पद्धतीने बनवलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. रस्त्यावरील खाद्यपदार्थ घेताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. वातावरणातील बदलामुळे देखील विषाणूजन्य संसर्ग पसरून पोटदुखी, सर्दी, खोकला यांसारखे आजार बळावतात. याशिवाय जेवणापूर्वी हात न धुणे, अस्वच्छ ठिकाणी राहणे यांमुळे जंतूंचा प्रसार होऊन पोटदुखी होऊ शकते.
या आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. पाणी किमान २० मिनिटे उकळून आणि गाळून पिणे हा जंतूसंसर्गापासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. शक्यतोवर घरचे ताजे अन्न खाणे आणि बाहेरचे, विशेषतः उघड्यावरील अन्नपदार्थ टाळणे गरजेचे आहे. बाजारातून आणलेल्या फळे आणि भाज्या मिठाच्या पाण्यात भिजवून, स्वच्छ पाण्याने धुवून खाव्या.
जेवणापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. साचलेले पाणी लगेच काढून टाकावे, कारण ते डासांसाठी प्रजनन स्थळ बनते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोटदुखी, जुलाब, उलट्या यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नागरिकांनो, सतर्क राहा आणि वरील उपायांचे पालन करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला पोटदुखीच्या आजारापासून सुरक्षित ठेवा. आरोग्य यंत्रणेनेही या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.