Uncategorized

कुंभमेळ्यातील साधू-संतांचा शाप; राम मंदिर नाही तर २०१९ मध्ये मोदींना मत नाही!

लखनऊ : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. साधू-संतांचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने यंदाचा कुंभमेळा भव्य दिव्य करण्याची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः कुंभमेळ्याच्या आयोजनात लक्ष घालत आहे. हिंदूंना खूश करण्यासाठी, त्यांची मतं मिळवण्यासाठी भाजप सरकारला ही मोठी संधी आहे. ही संधी गमावता कामा नये यासाठी भाजपकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या या प्रयत्नांना मात्र सुरुंग लागणार असल्याचं दिसतंय. कारण कुंभमेळ्यात कोणतीही कमतरता ठेवण्याचा भाजप सरकारचा इरादा असला तरी एक गोष्ट मात्र भाजप सरकारला करता आली नाही. ती गोष्टच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते.

साधू-संत भाजपवर नाराज-

प्रयागराजमध्ये येत असलेले साधू भाजप सरकारवर नाराज असल्याचं चित्र आहे. कारण आहे या वर्षातील सर्वाधिक चर्चित राजकीय मुद्दा राम मंदिर… राम मंदिराच्या नावावर भाजपने २०१४ साली मतं मागितली होती, मात्र सत्तेत येऊन साडेचार वर्षे उलटली तरी भाजपला राम मंदिराची एक वीटही रचता आलेली नाही. नुकत्याच भरलेल्या धर्म संसदेत राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपला रोषाचा सामना करावा लागला होता. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं देखील अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला होता. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणारे साधू याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर नाराज आहेत.

नेमकं काय आहे साधू-संतांचं म्हणणं?

२०१४ साली भाजपनं हिंदुत्त्वाच्या तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावर मतं मागितली होती. मोदी पंतप्रधान झाले तर अयोध्येत राम मंदिर होईल, अशी साधू-संतांना अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी नरेंद्रगिरी महाराज यांनी याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मोदींनी सर्वसामान्य हिंदूंचा विश्वासघात केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक वाटत नाही. असं वाटतं की राम मंदिराची निर्मिती होऊच शकत नाही त्यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहे. लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे सरकारला २०१९ च्या निवडणुकीत याचे परिणाम भोगावं लागतील- स्वामी नरेंद्रगिरी महाराज

भारतीय जनता पक्षाला विकासाच्या नावावर मतं मिळालेली नाहीत. विकासाच्या नावावर लोकांनी मतं दिली असती तर आज अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असते. गोध्राकांडानंतर मोदींचा हिंदुत्ववादी चेहरा समोर आला. लोकांनी विचार केला की उत्तर प्रदेशमध्ये योगीजी असतील आणि केंद्रात मोदीजी असतील तर राम मंदिराची निर्मिती सहज होईल. मोदींच्या राज्यात विकास होतोय, वीज मिळतेय, रस्ते बनत आहे, मात्र लोकांनी मतं तर राम मंदिरासाठी दिली होती. आता राम मंदिर बनलं नाही तर भाजपला त्याचा मोठा फटका बसेल, असं नरेंद्रगिरी महाराज यांनी म्हटलं आहे.

मंदिर झालं तरच सरकार बनेल-

निरंजनी आखाड्याचे प्रमुख महंत केशव पुरी महाराजांनी सुद्धा भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. साधू-संतांनी राम मंदिराचा मुद्दा सुटेल म्हणून भाजपला साथ दिली होती. सरकार येऊन साडेचार वर्षे उलटली तरी राम मंदिराचा मुद्दा तसाच आहे त्यामुळे सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेत नाही असं आम्हाला वाटतं. आता राम मंदिर बनलं तरच हे सरकार राहील, अन्यथा लोकांचा या सरकारवरचा विश्वास उडेल, असं केशव पुरी यांचं म्हणणं आहे.

राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे, त्यामुळे या मुद्द्यावर इच्छा असूनही सरकारला काहीच करता येत नाहीये. राम मंदिर आस्थेचा विषय असला तरी सरकारचे हात आता बांधलेले आहेत. साधू-संतांची नाराजी जरुर आहे, मात्र सरकार यावर काय निर्णय घेऊ शकेल, असं मला वाटत नाही- महंत गणेश आनंद सरस्वती

नरेंद्रगिरींनी सांगितला उपाय मात्र…-

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी नरेंद्रगिरी महाराज यांनी यावर एक उपाय देखील सांगितला आहे. हिंदू आणि मुस्लीम धर्माचे धर्मगुरु एकत्र बसले आणि त्यांनी चर्चा केली तर यावर मार्ग निघू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र राजकीय नेते दोन्ही धर्माच्या धर्मगुरुंना एकत्र बसू देत नाहीत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

IMPIMP