मोदींच्या भाषणावर परिणाम होऊ नये म्हणून 16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनाची घोषणा?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरुन आता मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. वाजपेयींचं निधन नेमकं कधी झालं?, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांमुळे नरेंद्र मोदी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असून हा मुद्दा आता चांगलाच तापण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाले संजय राऊत?

अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट रोजी झाले की त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 16 ऑगस्टच्या भाषणावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून 16 ऑगस्टला त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय शोक व्यक्त करत नाहीत तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवत नाहीत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधायचे होते म्हणूनच वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्टला झाले किंवा त्याची घोषणा त्या दिवशी केली गेली, असं संजय राऊत म्हणाले.

अटल बिहारी वाजपेयींचं निधन-

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्या 15 ऑगस्टला संध्याकाळपासून येण्यास सुरुवात झाली. सकाळी पंतप्रधान मोदींसह सर्व मंत्र्यांनी एम्समध्ये धाव घेतली. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी 9 आठवडे त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

मोदी हसत असल्याचे फोटो आले होते समोर-

एम्समध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये नरेंद्र मोदी एम्समधील डॉक्टरांसोबत हसत असल्याचं समोर आलं होतं. काही लोकांनी हे फोटो एम्समधील नसूल केरळमधील असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र हे स्पष्टीकरण खोटं असल्याचं समोर आलं होतं. अनेक वाहिन्यांनी केलेल्या व्हायरल चेकमध्ये मोदींची हे फोटो एम्समधील असल्याचं समजलं होतं. मात्र ते वाजपेयींच्या मृत्यूच्या आधीचे असल्याचा दावा देखील करण्यात आला होता.