सत्तेत राहून न्याय देत नाहीत अन् रस्त्यावर उतरून नाटकं करतायेत- नवनीत राणा

नवी दिल्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून विमा कंपन्यांवर धडक मोर्चा काढला होता. शिवसेनेच्या याच मोर्च्यावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सत्तेत राहून न्याय देत नाहीत अन् रस्त्यावर उतरून नाटकं करतायेत, अशा शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

‘भारती एक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने हा मोर्चा काढला होता. या मोर्चात शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सामिल झाले होते.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष फक्त नाटकं करतायेत. पण शेतकऱ्यांसाठी भल्यासाठी काहीतरी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. बनावट खत कंपन्यावर कारवाई करण्याकरिता केंद्र सरकारने समिती नेमावी, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे.

शेतकऱ्यांची पीक विमा योजनेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या सर्व खासगी विमा कंपन्यांच्या विरोधात हा मोर्चा होता, अशी भूमिका घेत शिवसेनेने हा मोर्चा काढला होता.

काँग्रेस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तर आमच्यावर टीका करणार्‍यांनी आधी स्वतःच्या रक्तातील भेसळ बघावी, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना दिलं आहे.