जाणता राजा! अकाली निधन झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना दिलं मायेचं छत्र

परभणी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या या विशेषणावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर काहींनी आक्षेप सुद्धा घेतला. मात्र शऱद पवार कधी स्वतःला हे विशेषण लावत नाही त्यामुळे त्यांनी यावर उत्तर देणं महत्त्वाचं मानलं नाही. ते आपलं काम करत राहिले आणि त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना हे विशेषण वापरलं जाऊ लागलं. शरद पवार यांच्या ‘जाणता राजा’ विशेषणाची प्रचिती देणारी घटना नुकतीच घडली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करणाऱ्या अँड. विष्णू नवले-पाटील यांचं 12 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अँड. नवले-पाटील हे परभणी महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य होते. खुद्द शरद पवार यांनीच त्यांना ही संधी दिली होती. त्यांच्या निधनाची बातमी शरद पवार यांना कळाली. त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याशी चर्चा करून नवले कुटुंबाची माहिती घेतली.

बाबाजानी यांनी शरद पवार यांना याबद्दल माहिती दिली. नवले-पाटील यांच्यामागे पत्नी, 7 वर्षांची मुलगी आणि 14 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

नवले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. शरद पवार यांना ही माहिती समजताच त्यांनी नवले कुटुंबाला तातडीने 5 लाख रुपयांची मदत द्यावी, असं बाबाजानी यांना सांगितलं. स्वतः शरद पवार यांनी या रक्कमेचा धनादेश आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे सुपूर्द केला.

मला पवार साहेबांचा निरोप आला. त्यामुळे मी मुंबईला लगेच गेलो. तेथे त्यांनी माझ्याकडून नवले यांच्या कुटूंबियाची माहिती घेतली. व तातडीने मला पाच लाख रुपयाचा धनादेश देऊन तो नवले कुटूंबियांना द्यावा असे आदेश दिले. आपल्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या परिवाराची काळजी पवार साहेब कशी घेतात हे यानिमित्ताने सर्वांना कळले. नवले पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसल्याही प्रकारची अडचण असेल तर सोडविण्याचा निश्‍चितच प्रयत्न करेल असा शब्द मी पवार साहेबांना दिला आहे. – बाबाजानी दुर्राणी, आमदार

नवले-पाटील यांचं निधन झाल्यानंतर शरद पवारांनी दखल घेतली असं नाही तर ते आजारी असतानाही शरद पवारांचं त्यांच्याकडे लक्ष होतं. मध्यंतरी नांदेडमध्ये नवले यांच्यावर उपचार सुरु होते. तेव्हा शरद पवार यांनी स्वतः तेथील डॉक्टरांना फोन केला होता. या फोनची ऑडिओ क्लीप देखील व्हायरल झाली होती.

नवले पाटील आता या जगात नसले तरी शरद पवार आता त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. नवले कुटुंबाला त्यांनी आधार दिला आहे. यामुळे नवले कुटुंबाला दुःखातून सावरण्यास मदत मिळेल.