“आपल्याकडे कार्यकर्त्यांचा दर्यासागर… संपत्तीच्या डोंगराला उध्वस्त करा”

बीड |  महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने चालणारा आहे. यात एका बाजूला संपत्तीचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा दर्यासागर आहे. या अथांग सागरात संपत्तीचा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद तुमच्यात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवला. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील जनतेला भेटण्यासाठी मी बाहेर पडलो आहे, असं म्हणत बीडच्या कार्यकर्ता मेळाव्याला पवारांनी संबोधित केलं.

आपल्या पक्षातून निघून जाताना या भागातील नेत्यांनी विकासासाठी पक्ष सोडत असल्याचे वक्तव्य केले. पक्षात असताना तुम्ही १५ वर्षे आमदार झालात, तुम्हाला राज्यमंत्रीपद दिले, मग या १५ वर्षांत तुम्ही नेमकं काय केलं, असा सवाल उपस्थित करत गयारामांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं.

दिवाळीच्या आधी मतमोजणी होणार आहे. यावेळी आम्ही पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे निश्चित केले. हा महाराष्ट्र तरुण पिढीच्या हाती देऊन उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे, असं सूचक वक्तव्य पवारांनी यावेळी केलं.

आम्ही सत्तेत असताना शिक्षणावर भर दिला. आज देशात तसेच राज्यात शिक्षित मोठ्या प्रमाणावर आहेत मात्र नोकऱ्या मिळत नाहीत, अशी टीका त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर केली.

दरम्यान, बीडमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये परळीमधून धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-