‘नगर पॅटर्न’मध्ये आता शरद पवारांची एन्ट्री; घेणार सर्वात मोठा निर्णय?

अहमदनगर : अहमदनगर महापालिका त्रिशंकू होती. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर केला. शिवसेनाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्त्वाला विश्वासात न घेता हे पाऊल उचललं. राज्याच्या राजकारणात यामुळे भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणी आपल्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली मात्र एवढ्यावरच न थांबता राष्ट्रवादीने आता याप्रकरणी आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय. बंडखोरांना कडक इशारा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरमधील राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी हकालपट्टी होणार असल्याचं कळतंय. 

अहवालाचीसुद्धा वाट पाहणार नाही?

महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. राज्याच्या राजकारणात त्यामुळे एकच खळबळ उडाली होती, तसेच राष्ट्रवादीला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला होता.

राष्ट्रवादीची भाजपसोबत छुपी युती असल्याचा संदेश गेला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी योग्य संदेश जावा यासाठी कठोर निर्णय घेतल्याचं कळतंय. पक्ष आता अहवालाची देखील वाट पाहणार नसल्याचं कळतंय.

नेमकं काय घडलं नगरमध्ये?

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 14 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 नगरसेवक निवडून आले होते. तर 24 जागा मिळवत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे शिवसेना मतांची जुळवाजुळव करून पालिकेत आपला महापौर बसवेल, असा अंदाज होता. शिवसेनेला मात्र मतांची जुळवाजुळव करण्यास अपयश आलं. तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपने इथं खरा डाव खेळला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा नगरसेवकांना हाताशी घेतलं आणि त्यांच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. भाजपचे बाबासाहेब वाकळे नगरचे महापौर झाले तर याच युतीच्या जोरावर भाजपच्याच मालन ढोणे उपमहापौर झाल्या. 

राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय?

भाजप आणि राष्ट्रवादीची युती समोर येताच राष्ट्रवादीने सुरुवातीला सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ स्थानिक नेत्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. पक्षाकडून भाजपशी युती करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी परस्पर निर्णय घेतला आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरेसवकांना पक्ष नेतृत्वाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. तसेच भाजपला पाठिंबा देणे चुकीचे असून चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान त्यानंतर काही वेळातच या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली. आता याच नगरसेवकांची हकालपट्टी होणार असल्याचं कळतंय.