कोल्हापुर | रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं होतं. हे धरण खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध व्यक्त करत कोल्हापुरात तीव्र आंदोलन केले. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधीत खात्याचे मंत्री यांच्यावर कारवाई व्हावी या करिता निवेदन दिले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
शासनाला घटनेला घटनेचे गांभीर्य तर नाहीच तर उलट जलसंपदामंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटले सांगून अंगकाढूपणा हे सरकार करत आहे. खेकड्यांवर आरोप करून हे प्रश्न सुटणार नाहीत. खेकड्यांनी धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करत असतील तर त्या खेकड्यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली.
तिवरे धरण फुटून अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. परंतू धरण दुरूस्तीच्या प्रस्तावाकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं नसतं तर त्या 18 निष्पाप लोकांचा जीव वाचला असता…! धरणाला भगदाड पडल्याची तक्रार स्थानिक रहिवासी अजित चव्हाण यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली. प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर अनुचित प्रकार टाळता आला असता, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हटलं आहे.
दरम्यान, जे संबंधीत खात्याचे मंत्री व अधिकारी या गोष्टीस जबाबदार आहेत त्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.
खेकड्यांनी धरण फोडलं; जलसंपदा मंत्र्यांचा अजब दावा…. पाहा व्हीडिओ