शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर संग्राम जगताप यांचा मोठा खुलासा

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहिलेले संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. त्यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.

माझी आणि शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची भेट झाली नाही. मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. सोशल मीडियामध्ये कोणीतरी ही अफवा पसरवली आहे, असं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मागील आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची संग्राम जगताप यांनी भेट घेतली आणि जगताप शिवसेनेत जाणार, अशी पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती.

माझी कोणत्याही शिवसेना नेत्याची भेट झाली नाही. शिवसेनेमध्ये जाण्याचा माझा काहीही संंबंध नाही, अशी कोणाशीच कोणतीही चर्चा झाली नाही, असं सांगत संग्राम जगताप यांनी शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

महापालिका निवडणुकीत पक्षाचा आदेश धूडकावून लावत जगतापांनी बिनशर्त भाजपच्या महापौर उपमहापौरांना पाठिंबा दिला होता. यानंतर पवारांनी नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली होती.

विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत. नगर शहर मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. याच पार्श्वभूमीवर जगताप हे शिवसेनेत जाण्याच्या चर्चा सुरु असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.