पुढच्या निवडणुकीत 100 जागा पार करायच्या; पक्षाच्या वर्धापनदिनी निर्धार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी यापुढील निवडणुकीत आपल्याला शंभरी पार करायची आहे हा विचार डोक्यात ठेवून कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असा संदेश जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत आपल्या 56 जागा निवडून आल्या आहेत. कोरोनाचे संकट टळले की आम्ही सर्वच नेते राज्याचा दौरा करणार आहोत. आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे. पवार साहेबांचे विचार घरोघरी पोहोचवायचे आहे. यापुढील निवडणुकीत आपल्याला शंभरी पार करायची आहे हा विचार डोक्यात ठेवून कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राज्यावर एकामागून एक संकट येत आहेत. कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. लोकांच्या मदतीला धावून जावे. आज वर्धापनदिनीही साहेब कोकण दौऱ्यावर आहेत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची आदर्शवत भूमिका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोकणात झोकून काम करावे, असंही पाटील म्हणाले.

येत्या काळात आपल्याला शहरी भागात पक्ष बांधणी करायची आहे. त्यासाठी अर्बन सेलद्वारे जोमाने कार्य सुरू आहे. येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांवर आपण लक्ष केंद्रित करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही युवकांच्या हातात द्यायची आहे. मला आठवतं आम्ही तिशीत असताना आदरणीय पवार साहेबांनी आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या विश्वासाने सोपविल्या. आम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तेव्हा युवकांनी मिळणाऱ्या संधीचा उपयोग लोकसेवेसाठी करावा, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात हा सर्वात मोठा डिजिटल पक्ष ठरणार आहे. आपण राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हे अनोखे अभियान राबवत आहोत. लाखो कार्यकर्ते आपली मतं मांडत आहेत. कार्यकर्त्यांशी दुहेरी संवाद साधला जात आहे. अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

सोशल मीडियामार्फत खोटी माहिती पसरवण्याचे काम विरोधी पक्षामार्फत केले जात होते. मात्र 2019 साली लोकांनी साहेबांच्या पुरोगामी, सर्वसमावेशक विचारांचा स्वीकार केला. संपूर्ण सोशल मीडिया साहेबमय झालं. आज हेच सोशल मीडियाचे माध्यम आपली ताकद आहे, असं सांगत त्यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना तसंच हितचिंतकांना वर्धापनदिनी शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

-पवारसाहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे, बापाला मुलाचं ज्ञान कमीच वाटतं- देवेंद्र फडणवीस

-अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत- गृहमंत्री

-“अहो, कोथरूडचे उपरे पाटील….. शरद पवारांना संकटकाळात जाग असतेच”

-“पवारांनी 2 दिवसांत धोबीपछाड दिल्याने 6 महिने झाले भाजपवाले झोपलेच नाहीत”

-रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटनांवर राजेश टोपे म्हणाले…