नितेश राणेंना मोठा झटका; 14 दिवस पुन्हा कोठडी!

सिंधुदुर्ग |  काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. त्यांच्यासह 18 जणांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजच्यासह त्यांना आणखी 14 दिवस कोठडीतच काढाव्या लागतील. 

नितेश राणे ओरोस जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत. याआधी नितेश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये आमदार नितेश त्यांच्या कार्यकर्त्यांविरूद्ध 353, 342, 143, 148 आणि 149 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नितेश राणे, मिलिंद मिस्त्री, निखिला आचरेकर, मामा हळदिवे, मेघा गांगण यांचा समावेश आहे.

नितेश राणे यांना राष्ट्रवादी आणि मनसेने पाठिंबा दिला आहे. नितेश राणे यांच्या समर्थनार्थ मनसे आणि राष्ट्रवादी 16 जुलै रोजी जेलभरो आंदोलन करणार आहेत.