मुंबई | भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांप्रमाणे लोकभावनेची ताकद ओळखावी, अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जावं, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला अंधारात टाकणार नाही. हवे तर पुन्हा गोलमेज परिषद घेतली जाईल. पाटील किंवा देशमुखांच्या मुलांची चिंता नाही. परंतु आघाडी सरकारला खानच्या मुलाची चांगलीच चिंता असल्याचा टोलाही नितेश राणेंनी यावेळी बोलताना लगावला आहे.
ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजे, अशी मगणी नितेश राणेंनी केलीये.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने 2018 मध्ये कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिलं. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली, असं ते म्हणाले.
फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवलं. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती, असंही नितेश राणे म्हणालेत.
ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल आणि तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील, असंही ते म्हणाले.
केंद्र सरकारने घटना दुरस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. हे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत, अशी टीका त्यांनी केलीये.
नितेश राणे यांनी यावेळी बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांना हल्ली मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत असल्यामुळे ते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोडवे गात असल्याचा टोला नितेश राणेंनी राऊतांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ ठिकाणी पाऊस, हवामान खात्याचा इशारा
‘सत्यमेव जयते’; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांचे सूचक ट्विट
महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली धक्कादायक माहिती
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणार असाल तर जाणून घ्या हे नवे नियम!