तंत्रज्ञान देश

आता गाडी विकत घेण्याची गरज नाही; मारुती-सुझुकीनं आणली ही जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली | सध्या कोरोना संकटामुळे ऑटोमोबाईल क्षेत्र अडचणीत सापडले आहे. कारण सध्या वाहन विक्रीमध्ये खूपच घट झाली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणत आहे.

जर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल पण तुमच्याकडे पैसे नसतील तरीही तुम्ही गाडी घेऊ शकता. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. मारुती सुझुकी कंपनीने ग्राहकांसाठी ही खूपच खास ऑफर आणली आहे.

या ऑफरमध्ये ग्राहक या गाडीचे भाडे देऊन गाडी घरी घेऊन जाऊ शकतात. नुकतेच मारुती सुझुकी कंपनीने सबस्क्राईब या नावाने एक प्रकल्प सुरू केला आहे. याची सुरवात देशातील सहा शहरांमध्ये सुरू झाली आहे.

दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरिदाबाद, गुरुग्राम आणि बंगळुरू या शहरांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. येत्या दोन-तीन वर्षात देशातील ६० शहरांमध्ये याचा विस्तार करणार आहे, असं कंपनीने सांगितले.

मारुती सुझुकीची एरिना नवी स्विफ्ट डिजायर, विटारा ब्रिजा आणि एर्टीगा, नेक्साची नवी बलेरा, सियान आणि एलएक्सआय ६ या गाड्या प्रकल्पाअंतर्गत ग्राहक निवडू शकतात.

या प्रकल्पाद्वारे ग्राहक वाहन खरेदी न करताही गाडी वापरू शकतात, असं कंपनीने सांगितले. यासाठी ग्राहकांना महिन्याला काही शुल्क द्यावे लागेल. या शुल्कात मेंटेनन्स, विमा आणि रस्त्यावर गाडी खराब होणे इत्यादी गोष्टींचा यात समावेश आहे.

ग्राहक या गाड्यांसाठी १२ महिने किंवा ४८ महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. जर दिल्लीमध्ये स्विफ्ट एलएक्सआयचे ४८ महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेतले तर त्याचे महिन्याचे १४,४६३ रुपये (करासहित) पासून सुरवात होते.

हे सबस्क्रिप्शन संपल्यावर ग्राहक पुन्हा याला रिन्यू करू शकतात. मारुती सुझुकीचे कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले,”ही सुविधा व्यक्तिगत ग्राहकांच्या हितासाठी सुरू केलेली योजना आहे. ग्राहकांना यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.”