माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी वेगाने कामाला सुरुवात केली आहे. काही धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जगभरात पाकिस्तानची प्रतिमा वाईट आहे. ती पुसून काढण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, मात्र यासोबतच पाकिस्तानमध्ये अंतर्गत खूप मोठमोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. हे प्रश्न सोडवण्याचं सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं आहे. महागाई ही त्या आव्हानांपैकी असून महागाई कमी करण्यासाठी त्यांनी आतापर्यंतचं सर्वात मोठं पाऊल उचललं आहे.
डिझेलची किंमत 17 रुपयांनी कमी होणार?
पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी इंधनाच्या दरावर नियंत्रण आणणं खूप मोठं काम आहे. त्यासाठी इम्रान खान यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. पाकिस्तानमध्ये डिझेलच्या किंमती 17 रुपयांनी कमी होणार आहेत. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री गुलाम सरवर यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
डिझेलचे भाव कमी केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात येतील, असा पाकिस्तान सरकारचा अंदाज आहे. यामुळे डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांचं सरकार डिझेलची किंमत कमी करून पेट्रोलच्या किंमतीपर्यंत आणण्याची योजना आखत आहे, अशी माहिती पाकिस्तानातील माध्यमांनी दिली आहे.
पाकिस्तानमधील पेट्रोल-डिझेलची स्थिती?
संघारमध्ये कच्चं तेल आणि प्राकृतिक गॅसचं भंडार सापडलं आहे, असं सरवर यांनी सांगितलं. तसेच पाकिस्तानचं नवं नेतृत्व तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत (तापी) पाईपलाईनचं काम वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमध्ये डिझेलचे भाव 112.94 रुपये प्रती लीटर होते. तर पेट्रोलचे भाव 95.24 रुपये प्रती लीटर होते.
फर्स्ट क्लास विमान यात्रेवर बंदी
डिझेलच्या दरात कपात करण्यासोबतच इम्रान खान यांच्या सरकारने आणखी काही क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर अधिकाऱ्यांच्या खर्चावर लगाम घालण्यात आला आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान , मुख्य न्यायाधीश, सिनेटचे चेअरमन, नॅशनल असेंबलीचे स्पीकर आणि मुख्यमंत्री बिजनेस क्लासमधून विमान प्रवास करतील, असा निर्णय इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे माहिती आणि सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.