राष्ट्रवादीला मोठा धक्का; या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई | वाडा-शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग-आऊटगोइंग चालू झालं आहे.

मंगळवारी पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

पांडुरंग बरोरा यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय. बरोरा अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील बरोरा यांची ओळख होती. पांडुरंग बरोरा यांचे वडील आणि शरद पवारांची घनिष्ठ मैत्री होती.

सहा महिन्यांपूर्वी शहापुरात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका झाल्या. तेव्हापासून ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. यादरम्यान ते शिवसेनेच्या संपर्कात आले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विधानसभेच्या तोंंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.