पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत?; ट्वीटरवरून भाजप शब्द हटवला!

मुंबई |  विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. मात्र त्यांची ही फेसबुक पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आगामी काळात पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे, अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर त्यांनी आता आपल्या ट्वीटवरून भाजप हा शब्द हटवल्याने त्या भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?, अशी भावूक पोस्ट त्यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये शेवटी ‘मावळे’ असा उल्लेख आहे. मावळे हा शब्द शिवसेनेसंदर्भात केला जातो. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, येत्या 12 तारखेला पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर कोणता निर्णय घेणार? आणि काय बोलणार?, याकडे सगळया महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या-