आई-वडिलांनी भाजीपाला विकून शिकवलं, पोरीनं साऱ्या राज्यात त्यांचं नाव करुन दाखवलं!

कर्नाटक | जीवनात काही करायचे असेल तर आपण म्हणतो की, माझी परिस्थिती नाही, पैसा नाही. थोडक्यात बरीच कारणे देतो. पण जीवनात कोणतीही गोष्ट करण्यासाठी पैसा, परिस्थिती किंवा अन्य कोणतीही गोष्ट लागत नाही, लागते ती फक्त काहीतरी करण्याची तीव्र इच्छाशक्ती. आज तुम्हाला अशाच एका तरूणीविषयी सांगणार आहोत, जिने फक्त तीव्र इच्छाशक्तीतुन आपले आपले ध्येय गाठले.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर गावाची २२ वर्षाची तरुणी आर. ललिता हिची ही प्रेरणादायी कथा आहे. ललिता यांनी केवळ परिस्थितीच्या पुढे जाऊन फक्त स्वप्न पाहिलं नाही तर ते पूर्णही केलं. ललिता यांचे वडील आणि आई भाजी विकण्याचे काम करत होते. वडिलांना लहानपणी शिकण्याची खूप आवड होती, पण घराच्या जबाबदारीमुळे त्यांना शिकता आलं नाही.

पण वडिलांनी आपल्या मुलांना चांगलं शिकवायचं ठरवलं होतं. ललिता लहानपणीपासून खूपच हुशार असल्यामुळे तिच्यावर कुटुंबाने विशेष लक्ष दिले. एकीकडे गरिबी पायातील बेड्या बनत होत्या तर दुसरीकडे ललिताची स्वप्नपूर्ती ध्येय उड्डाण घेण्यासाठी स्वतःसाठी पंख तयार करत होती. ललिता हिचे आई-वडील सकाळी ४ वाजता उठून गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेण्यास जायचे.

त्यातच ललिता या आईबरोबर दुकान उघडण्यासाठी जायच्या. ६ वाजेपर्यंत सर्व दुकान लागायचे. आई-वडिलांना कामात मदत केल्यानंतर जो थोडा फार वेळ भेटेल त्यात ललिता अभ्यास करत होत्या. मग शाळेत जात असे आणि तिथून पुन्हा आल्यावर दुकान आणि अभ्यास असा दिनक्रम चालू होता. कॉलेजपर्यंत हाच दिनक्रम चालू होता. पण एवढं सगळं असूनही ललिता यांनी अभ्यासातुन तसूभरही आपले लक्ष विचलित केले नाही.

या कठोर मेहनतीमुळे ललिता यांनी १० वीत ९४ टक्के आणि एसआरएस पीयू महाविद्यालयातुन ८७ टक्के मिळवले. एवढे घवघवीत यश मिळवून ललिता हिने सिद्ध केले होते की तिचे भविष्य हे उज्ज्वलच आहे. त्यानंतर ललिता यांनी सीईटीची प्रवेश परीक्षा दिली, त्यात तिने २०,००० वी रँक प्राप्त केली. यानंतर सीईटी कोट्यातून त्यांना बंगळुरूच्या ईस्ट वेस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील एरोनॉटिकल विभागात नंबर लागला. तिथे त्यांना वर्षाची १८ हजार रुपये फी भरावी लागायची.

२०१५ मध्ये ललिता प्रथम बंगळुरूमध्ये आल्या. तिथे त्या दिवसरात्र अभ्यास करायच्या. ललिता यांच्या या कठोर मेहनतीमुळे सर्वच लोक प्रभावित झाले. ललिता यांची अभ्यासाप्रति असलेली मेहनत आणि घरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तिची शेवटच्या वर्षाची हॉस्टेलची फी माफ करण्यात आली. एवढंच नाही तर त्यांना एक वेगळी खोलीही देण्यात आली, जिथे त्या आरामात अभ्यास करू शकतील.

ललिता यांना शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी जास्त तरुणच होते. त्यामुळे ते नेहमी तिला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. ललिता यांना हीच गोष्ट त्यांच्या ध्येयाजवळ घेऊन जात होती. १ फेब्रुवारी २०२० रोजी ललिता यांच्या मेहनतीचे फळ आले. ललिता यांनी आई-वडील, कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली. ललिता यांनी ऍरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये ९.७ ग्रेड प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.

वाऱ्याप्रमाणे सर्व देशात ही बातमी पसरली की, भाजीपाला विकणाऱ्याची मुलगी टॉपर झाली. ८ फेब्रुवारी रोजी बेळगांवमधील विश्वेश्वरैय्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठाने ललिता यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. ललिता यांचा प्रवास इथपर्यंतच थांबला नाही तर त्यांनी गेटची परीक्षा दिली. त्यात त्यांनी ७०७ गुण प्राप्त केले. एवढ्या कठोर मेहनतीने ललिता यांनी एक लक्ष्य मिळवले पण त्यांचे दुसरे लक्ष गाठण्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते आणि त्या दिशेने तिने एक पाऊल टाकले.

ललिता इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना आपला आदर्श मानते. ललिता यांना अवकाश शास्त्रज्ञ बनण्यासाठी इस्रोच्या डीआरडीओमध्ये जायचे आहे. सध्या ललिता यांना आयआयटी किंवा आयआयएससीतुन एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये मास्टर्स पदवी मिळवायची आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंटमध्ये निवड झाल्यानंतर ललिता आता एका एरोस्पेस कंपनीत इंटर्नशिप करत आहे. आम्हाला खात्री आहे की, ललिता जीवनात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत पास होईल आणि लवकरच तिचे स्वप्न पूर्ण करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सोशल मीडियावरील एका व्हिडीओचा चमत्कार; रडणारा बाबा हसू लागला!

बेअरस्टोचं शतक हुकलं, मात्र केलाय असा पराक्रम ज्यात डेविड वॉर्नरही सहभागी!

निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएलमध्ये केलाय असा पराक्रम, जो कुणालाही जमला नाही!

इलेक्ट्रिक कारमध्ये टाटांची बाजी; नेक्सॉननं रचला ‘हा’ सर्वात मोठा कारनामा!

लग्नाला 58 वर्षे झाल्यानंतर केले लग्नाचे फोटोशूट, कारण वाचून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू!