पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या गाडीच्या चालकाचे अपहरण झाले आहे. मनोज ज्योतितिराम सातपुते असं अपहरण झालेल्या चालकाचे नाव आहे.
तु पार्थ पवार यांचाच ड्रायव्हर ना… असं म्हणून अपहरणकर्त्यांनी सातपुते यांंचं अपहरण केलं आहे. त्यांचं मुंबईतून अपहरण करून त्यांना सुपा (ता. पारनेर) येथे बेशुद्धावस्थेत मारहाण करून सोडून देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार झाल्या घटनेने चिंतेत आहेत. सध्या ते मुंबई आणि पुणे पोलिसांच्या सातत्याने संपर्कात आहेत. पार्थ पवार झालेल्या घटनेची सखोल माहिती घेत आहेत.
5 जुलै रोजी मुंबईत कुलाबा बेस्ट डेपो जवळ मनोज सातपुते उभे असताना त्यांच्याजवळ एक लाल रंगाची ओमिनी गाडी आली. आणि तुम्ही पार्थ पवार यांचेच ड्रायव्हर ना?? अशी विचारणा केली. मनोज यांनी हो म्हटल्यावर आम्हाला त्यांना भेटायचे आहे, असं म्हणत त्यांनी मनोज यांना पुढच्या सीटवर बसवले. नंतरचं मला काही आठवत नाही, असं मनोज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
शरीरावर काही भागांवर मारहाण करून 6 तारखेला सकाळी 8 वाजता त्यांनी मला सुपे येथे सोडलं, एवढं मला आठवतंय, अशी माहिती सातपुते यांनी पोलिसांना दिली आहे.
चालक मनोज सातपुते यांनी शिक्रापुर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.