देश

मोदींचे फोटो लावण्यासाठी पेट्रोल पंपांवर दबाव; डिलर्स संघटनेच्या दाव्यानं खळबळ

लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने याच पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे एकच खळबळ उडली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून 2019 च्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा करण्यात आलाय. भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने हा दावा केला आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं यासंदर्भात बातमी दिली आहे.

नेमका काय आहे आरोप?

2019 च्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा. मोदींचा फोटो लावण्यास नकार दिला तर पेट्रोल पुरवठा बंद करू, अशी थेट धमकीच देण्यात आली आहे. भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेचे अध्यक्ष एस. एस. गोगी यांनी याबाबत माहिती दिली.  इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून दबाव आणला जात असल्याचं गोगी म्हणाले.

केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना देऊ केलेल्या एलपीजी कनेक्शनच्या योजनेचे डिस्प्लेही पेट्रोल पंपावर लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांकडून या सूचना देण्यात आल्याचा आरोप गोगी यांनी केला आहे.

आणखी काही धक्कादायक आरोप-

पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासोबतच आणखी काही धक्कादायक आरोप गोगी यांनी केले आहेत. देशभरातील पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांची खासगी माहिती सरकारने मागवल्याचा दावा त्यांनी केलाय. एवढंच नव्हे तर या कर्मचाऱ्यांची जात, धर्म, आणि ते कुठल्या मतदारसंघात येतात ही माहिती सुद्धा मागवण्यात आली आहे. या गोष्टी व्यक्तीगत अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या असून आम्ही या दबावाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत, असं एस. एस. गोगी यांनी म्हटलं आहे.

सरकारी कंपन्यांनी पाठवली होती पत्रं-

जून महिन्यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल या कंपन्यांनी देशातील 59,000 पेट्रोलियम डिलर्सला पत्रं पाठवली होती. पाठवून त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती द्यावयास सांगितले होते, यामागे पंतप्रधान स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण योजनेसाठी त्यांची ओळख पटवणं सोपं होईल असं कारण सांगण्यात आलं होतं, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. दरम्यान, माहिती देण्यास नकार दिला तर पेट्रोल पुरवठा बंद करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली होती असं म्हटलं आहे.