पिंपरी चिंचवडमध्ये सध्या रस्त्यांवर लागलेल्या एका बॅनरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. “शिवडे, आय अॅम सॉरी”, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. शहरातील पिंपळे सौदागर भागात हे बॅनर लागले आहेत. शहरातील नाक्या नाक्यावर सध्या याच बॅनरची खमंग चर्चा रंगली आहे.
शहरातील रस्त्यांवर साधारणपणे जाहिरातबाजी करण्यासाठी फ्लेक्स लावले जातात. मात्र या चित्रविचित्र फ्लेक्समुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत. नानाविध तर्क लढवले जात आहेत.
साधारणतः रुसलेल्या प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी तिच्या प्रियकराने हा प्रकार केला असावा, अशी चर्चा आहे. शिवानी असं या प्रेयसीचं नाव असू शकतं. काही कारणामुळे तिचं आणि तिच्या प्रियकराचं भांडण झालं असावं आणि तिनं त्याच्याशी अबोला धरला असावा.
रुसलेल्या प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी तिच्या प्रियकरानं अनोखा फंडा केला असावा. “शिवडे, आय अॅम सॉरी”, असं इंग्रजीत लिहिलेले पोस्टर्स आणि त्यापुढे लव्हचं चिन्ह त्यामुळे या शक्यतांना जास्त बळ मिळत आहे.
दरम्यान, काही जणांना हा मार्केटिंग फंडा वाटत आहे. बिल्डिंग प्रोजेक्ट किंवा तत्सम बिझनेसमन आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी सध्या वारेमाप जाहिरातबाजी करत असतात. नाविन्यपूर्ण जाहिरातींची कमी असल्यामुळे अशा प्रकारे फ्लेसबाजी करुन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतं, अशी देखील चर्चा आहे.