आंबेडकरांची विधानसभेची रणनिती ठरली; काँग्रेस आणि एमआयएमबाबत घेतली ही भूमिका

मुंबई |  आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही. काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही फरक नाही, काँग्रेस आघाडीसाठी लोकसभेसारखंच वागतंय. आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय मात्र ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही, असं म्हणत विधानसभेला काँग्रेससोबत जाणार नसल्याचे संकेत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.

आगामी विधानसभेची तयारी आणि भारिपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला.

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आमचा एमआयएमसोबत युतीचा प्रयत्न राहील, अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे. तर आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनानंतर आमची यादी जाहीर करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पूर आलाय. कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी सरकारने दुर्लक्ष केले आहे. या अशा मॅनेज न करणाऱ्या सरकार विरोधात आम्हाला प्रचाराला वेळ हवा आहे, जे येतील त्यांच्यासोबत जाणार, असंही ते म्हणाले.

वंचितने लोकसभेवेळी महाराष्ट्रातील ताकद दाखवली. विधानसभेलाही वंचित ताकद दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.

तीन ते चार वेळा काँग्रेस आमच्यासोबत खेळत राहिली. काँग्रेसमध्ये लोकसभेवेळी आणि आताही कोणताही फरक नाही. काँग्रेससोबत जाण्याच्या इच्छेमध्ये नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.