नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता या पदावर त्यांचीच बहिण प्रियांका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
प्रियांका गांधी यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने त्यांच्या राजीनाम्याचा स्वीकार केला नाही, मात्र “माझ्याकडे अध्यक्षपद नको. गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष शोधा”, अशा सूचना राहुल गांधी यांनी पक्षाला दिल्या होत्या.
राहुल गांधी ऐकत नसल्याने नाईलाज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या अध्यक्षाची चाचपणी सुरु केली. यामध्ये महाराष्ट्रातील सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेकांची नावं चर्चेत होती.
आता मात्र नवीनच मागणी काँग्रेसमध्ये जोर धरु लागली आहे. प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं, अशी ही मागणी आहे.
राहुल गांधी यांनी स्पष्टपणे गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदासाठी शोधा, अशी सूचना देऊनही अनेक नेत्यांनी प्रियांका गांधी यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जैसवाल, अनिल शास्त्री, ओदिशातील काँग्रेस नेते भक्त चरणदास यांनी ही मागणी केली आहे. प्रियांका गांधींपेक्षा चांगला पर्याय काँग्रेसकडे नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
महत्वाच्या बातम्या-