पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींवरुन वाद; खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल

पुणे | शहराला जसा पेशवेकालीन आणि मराठेशाहिचा इतिहास आहे तसाच गणपती उत्सवाचा देखील इतिहास आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी मुंबई आणि पुण्यात सार्वजनिक गणपती उत्सवांची स्थापना केली.

खुद्द टिळकांनी पुण्यातील अनेक गणपती मंडळांची स्थापना करुन गणपती बसवायला सुरुवात केली होती. इंग्रज साम्राज्याविषयी लोकांत जनजागृती करण्याच्या हेतुने टिळकांनी गणेशोत्सव सुरु केले.

पुढे त्यांनी एक बैठक घेऊन मानाच्या पाच गणपतींची नावे नक्की केली आणि मानाच्या मिरवणुकांची प्रथा पडली. पण तसा कोणताही कायदा नाही. त्यावरुन आता पुण्यातील इतर मंडळांनी आक्षेप घेतला आहे.

अनुक्रमे श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ आणि श्री केसरीवाडा गणपती असे मानाचे पाच गणपती आहेत.

पाच मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भाविकांचा मोठा जनसागर लोटतो. या गणपतींच्या मिरवणुकीत नयनरम्य अशी रोषणाई आणि वादन असते. त्यामुळे संपूर्ण लक्ष्मी मार्गावर त्यांचा गजबजाट असतो.

पोलीस देखील या पाच मानाच्या गणपतींना विशेष सहाय्य देतात, तसेच इतर मंडळांना आणि गणपतींना पाच मानाच्या गणपतींच्या मागून यावे लागत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

या विरोधात बढाई समाज ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात काही मागण्या केल्या आहेत.

शहरातील पोलीस विसर्जन मिरवणुकीत पाच मानाच्या गणपतींना प्राधान्य देतात. विनंत्या करुनही ते आम्हाला सहाय्य करत नाहीत. पाच मानाच्या गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील अन्य मंडळांना तुच्छतेची वागणूक मिळते.

मानाच्या गणपती मिरवणुकांची प्रथा 130 वर्षे जुनी आहे, पण तसा कोणताही कायदा नाही. तसेच मानाचे गणपती मिरवणूक पूर्ण करायला खूप वेळ लावतात आणि बाकीच्यांवर पोलीस गुन्हे दाखल करतात, अशा तक्रारी याचिकेतून मांडण्यात आल्या आहेत.

न्यायालयाने सर्वांना आणि सर्व मंडळांना समान लेखत योग्य न्याय करुन बाकीच्या मंडळांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी याचिकेत विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

अण्णा हजारेंचे अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र; वाचा सविस्तर

बाबरी मशीद आणि गुजरात दंगलीवर न्यायालयाचा मोठा निर्णय

पोलीस इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल

जय शहा यांच्या तिरंगा नाकारण्यावर प्रकाश राज आक्रमक; ट्विट करत म्हणाले,

भाजप – मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य