खेळ

भारताचा वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगची क्रिकेटमधून निवृत्ती

आर. पी. सिंग माहित नसेल असा क्रिकेटचा चाहता भारतात शोधून सापडणार नाही. वेगवान गोलंदाज असलेला आर. पी. दिसायला जितका मोहक होता तितकीच त्याची शैलीही मोहक होती. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात न दिसलेल्या या चेहऱ्यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आर. पी. सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चांगलीच भावनिक देखील आहे.

पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात योगदान-

2007 साली पहिला टी-20 विश्वचषक पार पडला होता. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या भारतानं हा विश्वचषक जिंकला होता. हा विश्वचषक जिंकण्यात आर. पी. सिंगचा मोलाचा वाटा होता.

आर. पी. सिंगची कारकीर्द-

4 सप्टेंबर 2005 रोजी आर. पी. सिंगला पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळायची संधी मिळाली होती. यानंतर बरोबर 13 वर्षांनी म्हणजेच 4 सप्टेंबर 2018 रोजी त्यानं निवृत्तीची घोषणा केली. आरपी सिंगनं 6 वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळले. त्याने खेळलेल्या 82 मॅचमध्ये 100 विकेट घेतल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये आर. पी. सिंगनं 14 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 40 विकेट्स मिळवल्या. 59 धावांमध्ये 5 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

आर. पी. सिंगनं 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये 69 बळी घेतले आहेत. 35 धावा देऊन 4 बळी ही त्याची एकदिवसीय कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी आहे.

आर. पी. सिंग आपल्या कारकीर्दीत 10 टी-20 सामने खेळला. यामध्ये त्याने 15 बळी घेतले.  13 धावात 4 बळी ही त्याची टी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

ट्विटमध्ये आर. पी. सिंगनं काय म्हटलंय?

13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 4 सप्टेंबर 2005 रोजी मी पहिल्यांदा भारताची जर्सी घातली होती, असं आर. पी. सिंगनं म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्याने कुटुंब, बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनेचे आभार मानले आहेत.

माझा आत्मा आणि मन आजही त्या तरुण मुलासोबत आहे, ज्यानं पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याला चेंडू हातात घेऊन फक्त खेळायचं होतं पण शरीरानं वय झाल्याचं सांगितलं. आता युवा खेळाडूंसाठी जागा खाली करण्याची वेळ आलीय. – आर. पी. सिंग, भारताचा माजी क्रिकेटपटू

IMPIMP