“तुमची अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत तर अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय”

अहमदनगर |   शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. राऊतांच्या टीकेची राधाकृष्ण विखेंनी सव्याज परतफेड केली आहे. राऊतांना खुलं पत्र लिहीत त्यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

आमची बांधिलकी जनतेशी आहे आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. तुमची अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय, अशी घणाघाती टीका विखेंनी राऊतांवर केली आहे.

थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके, असा टोला लगावत. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं प्रत्युत्तर त्यांनी राऊतांना दिलं आहे.

बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती, असा बोचरा वार विखेंनी केला आहे. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का?, असा सवाल त्यांनी राऊतांना विचारला आहे.

आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील, अशा शब्दात विखेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांना खुलं पत्र; पत्रात अनेक धक्कादायक आरोप

-कृषीमंत्री दादाजी भुसे यांचं शेतकऱ्यांना ‘हे’ कळकळीचं आवाहन

-मुंबईतली कोरोना स्थिती कधी नियंत्रणात येईल?, महापालिका आयुक्तांनी सांगिती तारीख!

-संजय राऊतांनी शिवसेनेचे सोडून काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले का?; विखे-पाटलांचा पलटवार

-अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा; मराठा ठोक क्रांती मोर्चाची मागणी