देश

काँग्रेस अध्यक्षपद सोडलेल्या राहुल गांधींवर आणखी एक खटला

मुंबई : नुकतंच काँग्रेस अध्यक्षपद सोडलेल्या राहुल गांधी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. त्यांना आता आणखी एका खटल्याचा सामना करावा लागणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदनामी प्रकरणी राहुल यांच्यावर मुंबईच्या माझगाव शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यात येणार आहे. संघाचे कार्यकर्ते आणि वकील धृतिमन जोशी यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

राहुल गांधी यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यावर तसेच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली होती. मात्र वैयक्तिक वक्तव्याशी पक्षाचा संबंध नसल्याचं कारण देत सोनिया गांधींचं नाव खटल्यातून वगळण्यात आलं.

राहुल गांधी आणि सीताराम येचुरी गुरुवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. यावेळी दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. आरोप अमान्य केल्यानं आपल्यावर अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यात येईल, असं न्यायालयानं त्यांना सांगितलं.

दरम्यान, न्यायालयाने राहुल गांधी यांना १५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला आहे, तसेच खटल्याच्या सुनावणीला कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची परवानगीही दिली आहे.

IMPIMP