“गेल्या 100 दिवसांत कोणतीही विकासकामं केली नाहीत, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे.

गेल्या 100 दिवसांत सरकारने कोणतीही विकासकामं केली नाहीत. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. देशाची अर्थव्यवस्था संकटात असून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारकडे नेतृत्व, दिशा आणि योजनांचा अभाव आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचा नाश करून मौन धारण केलं आहे. कंपन्या संकटात आहेत, व्यापार ठप्प आहे. परंतु, सरकार नाटक, लबाडी, खोटेपणा आणि प्रचारातून देशाची बिकट स्थिती लपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आठ क्षेत्रांचा विकासदर दोन टक्क्यांनी घसरला आहे. तरीही अर्थमंत्री अर्थव्यवस्था कोसळली नसल्याचं सांगतात. सरकारकडून अशीच लबाडी आणि दुर्लक्ष होत राहिले, तर आपली वाटचाल मंदीकडे होईल, असं प्रियांका गांधी यांंनी म्हटलं आहे.

दरम्यान, दडपशाही, गदारोळ आणि अराजकता या तीन शब्दांत सरकारच्या 100 दिवसांचं वर्णन करता येईल, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.