दिवाळीत राज ठाकरेंनी फोडले जोरदार फटाके; पाहा संपूर्ण सीरिज

यंदाची दिवाळी प्रत्येकासाठी चांगली गेली असेल, मात्र मनसे प्रमुख राज ठाकरेंसाठी ही दिवाळी खास होती. त्यांनी आपल्या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्यंगचित्राची एक सीरिज प्रकाशित केली. ही सीरिज खूपच लोकप्रिय झाली. लोकांनी या व्यंगचित्राला डोक्यावर घेतलं. राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांचा त्यांच्या विरोधकांनी धसका घेतला. अनेकांनी सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात शेअर केली. राजकारणातच नव्हे तर व्यंगचित्राच्या दुनियेतही राज ठाकरे चलती असल्याचं यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं. मात्र हे नेमकं कसं घडलं? राज ठाकरे यांनी या सीरिजची घोषणा केल्यापासून त्यांच्या अगदी अलिकडच्या व्यंगचित्रापर्यंतचा हा प्रवास…

राज ठाकरे यांच्याकडून घोषणा-

राज ठाकरे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सक्रीय झाले. त्यांचे निकटवर्तीय तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी सोशल मीडियावर येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत एका जंगी कार्यक्रमात त्यांच्या फेसबुकच्या पेजची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ते ट्विटरवर देखील अॅक्टिव्ह झाले. सोशल मीडियावर येण्यामागचं प्रयोजन राज ठाकरे यांनी या घोषणेवेळीच सांगितलं होतं. कार्यकर्त्यांसोबत संवाद यासोबतच आपली व्यंगचित्रं शेअर करण्याचा मनसुबा त्यांनी यावेळी जाहीर केला होता. त्यानंतर राज ठाकरे आपली व्यंगचित्रं या पेजवर टाकत होते, तसंच ट्विटरवर देखील शेअर करत होते. या व्यंगचित्रांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र त्यामध्ये सुसंगतपणा नव्हता. वेळ मिळेल तशी ते व्यंगचित्रं काढत आणि पेजवर टाकत.

यंदाच्या दिवाळीत मात्र त्यांनी व्यंगचित्रांची एक मालिकाच पेश केली. दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी या मालिकेची घोषणा केली. वरील पोस्ट ही तीच पोस्ट होती. ज्यामध्ये त्यांनी 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान व्यंगचित्रांची मालिका घेऊन येत असल्याचं जाहीर केलं होतं.

राज ठाकरेंचा पहिलाच षटकार-

धनत्रयोदशीच्या दिवशी राज ठाकरे यांनी आपल्या या व्यंगचित्राच्या मालिकेतील पहिलं व्यंगचित्र सादर केलं. भारत मातेला या व्यंगचित्रामध्ये आयसीयूमध्ये दाखवण्यात आलं होतं. दवाखान्याबाहेर मोठी गर्दी असल्याचं दिसतं आहे. धनत्रयोदशी काळजी कारण नसल्याचं सांगत आहे. गेल्या चार साडेचार वर्षात त्यांच्यावर खूप अत्याचार झाले, लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर, असं ती म्हणत आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. राज ठाकरे यांचं हे या मालिकेतलं पहिलं व्यंगचित्र हिट ठरलं होतं. ही पोस्ट लिहिपर्यंत या व्यंगचित्राला 12 हजार लाईक्स मिळाले असून 1800 लोकांनी ते शेअर केलं आहे तर 363 जणांनी त्यांवर कमेंट केल्या आहेत.

राज ठाकरेंचं लक्ष्य भाजप-

राज ठाकरेंनी व्यंगचित्राची ही सीरिज सुरु केली, मात्र ही सीरिज जसजशी पुढं सरकू लागली तसतसा राज ठाकरे यांचा रोख लक्षात येऊ लागला. त्यांचा सर्वाधिक रोष हा मोदी सरकारवर आहे त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने मोदी सरकारलाच लक्ष्य केलं. दुसऱ्या व्यंगचित्रात त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी टाकलेल्या या व्यंगचित्राला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. ही पोस्ट लिहिपर्यंत या व्यंगचित्राला 11 हजार लाईक्स, 346 कमेंट्स तर 1800 शेअर मिळाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निशाण्यावर-

तिसऱ्या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस अभ्यंगस्नाला बसले आहेत आणि घराबाहेर मोठी गर्दी जमली आहे, असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे.

साहेब, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे, पाठवू का?, असं एकजण त्यांना विचारताना या व्यंगचित्रात दिसत आहे. राज ठाकरे यांचं हे व्यंगचित्रही तुफान लोकप्रिय ठरलं. या व्यंगचित्राला 14 हजार लाईक्स, 559 कमेंट्स तर 3 हजारपेक्षा जास्त शेअर मिळाल्या.

राज ठाकरेंच्या चौथ्या व्यंगचित्रात भाजपलाच लक्ष्य करण्यात आलं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात मोदी, गडकरी, फडणवीस यांना दाखवण्यात आलं आहे. त्यांच्यापुढे लक्ष्मी माता उभी आहे.

बाबांनो, गेल्या चार-साडेचार वर्षात तुम्ही जनतेसमोर फेकलेले हजारो लाखो कोटीमधले आकडे ऐकून मीही थक्क झाले, असं लक्ष्मीमाता या तिघाना म्हणत आहे. राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राला देखील लोकांनी डोक्यावर घेतलं. 14 हजार लाईक्स 522 कमेंट्स आणि 2800 पेक्षा जास्त शेअर या पोस्टला मिळाल्या.

शिवसेना-भाजपची युती निशाण्यावर-

शिवसेना-भाजपच्या युतीचा सध्या राज्यात सावळा गोंधळ सुरु आहे. या गोंधळावर नेमके पणानं बोट ठेवण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं. पाडव्याच्या दिवशी त्यांनी सादर केलेलं व्यंगचित्र सेना-भाजपच्या युतीवर जोरदार निशाणा साधणारं होतं.

सेना-भाजपचं सरकार ओवाळायला आलंय आणि बळीराजाची बायको आपल्या नवऱ्याला तंबी देतेय असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. ऐका… आत्ताच सांगून ठेवते. एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून तर याद राखा, असं ती म्हणत आहे. या व्यंगचित्राला 14 हजार लाईक्स, 555 कमेंट्स आणि 2 हजार 700 पेक्षा जास्त शेअर मिळाल्या आहेत.

भाऊबीजेच्या दिवशी राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केलेलं व्यंगचित्र या मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय व्यंगचित्रांपैकी एक व्यंगचित्र ठरलं. मोदी भाऊबीजेसाठी पाटावर बसले आहेत आणि भारतमातेला त्यांची बहिण दाखवण्यात आली असून ती त्यांच्याकडे पाठ करुन उभी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिलेल्या आश्वासनांचे बॅनर सगळीकडे झळकत आहेत. गेल्या वेळेस ओवाळले पण आता यापुढे नाही ओवाळणार, असा पवित्रा भारतमातेने घेतला आहे. तिच्या या पवित्र्यामुळे मोदींच्या तोंडचं पाणी पळालेलं या व्यंगचित्रात दिसत आहे. मोदींशेजारी ‘थापा’ हे विशेषण लावण्यास देखील राज ठाकरे विसरले नाहीत. या व्यंगचित्राला 12 हजार लाईक्स, 430 कमेंट्स आणि 2 हजार 600 पेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत.

जाता-जाता शिवसेनेला चपराक-

राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रामुख्याने भाजपला लक्ष्य केलं असलं तरी त्यांनी जाता जाता शिवसेनेला जोरदार चपराक लगावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्यात आलं आहे. यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. 

मुंबईच्या महापौरांना प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यात दाखवण्यात आलं आहे. बाळा त्यांना खायला घालू नको, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत, असं एक आई आपल्या मुलाला सांगत आहे, असं या व्यंगचित्रात दिसत आहे. या व्यंगचित्राला चांगला प्रतिसाद मिळाला. 7 हजार लाईक्स, 286 कमेंट्स आणि 1 हजार 400 पेक्षा जास्त शेअर या व्यंगचित्राला मिळाल्या.