राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यात?? निवडणूक आयोगाची राज यांना नोटीस

मुंबई :  मोदी शहांना राजकीय क्षितीजावरून हटविण्याचा निर्धार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती प्रचारसभा घेऊन त्याचा प्रत्यय महाराष्ट्राला दाखवून दिला. पण राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खर्चात टाकायचा? असे सवाल भाजप नेते विचारू लागले. मग ते विनोद तावडे असतील नाहीतर आशिष शेलार असतील… विनोद तावडेंनी तर निवडणूक आयोगाला पत्र लिहून राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला.  त्याच पत्राची दखल घेत निवडणूक आयोगाने राज ठाकरेंना नोटीस बजावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 वर्षात दिलेली आश्वासने कशी खोटी होती, असं म्हणत राज ठाकरेंनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून लोकांना दाखवले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रात एकूण 10 सभा घेतल्या. त्या सभांमधून त्यांनी भाजपवर आणि पर्यायाने मोदी शहांवर हल्लाबोल केला. 

मोदी शहांना राजकीय क्षितीजावरुन हटवण्यासाठी राज ठाकरेंनी महाराष्ट्रात एकूण 10 सभा घेतल्या. राज ठाकरेंनी घेतलेल्या प्रत्येक सभेत त्यांनी मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मग त्यामध्ये ‘भाजपने जनतेचा केसाने गळा कापला’ याचे असंख्य दाखले राज यांनी महाराष्ट्राला दिले.

राज ठाकरे किंवा मनसेचा एकही उमेदवार लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात नाही. मग त्यांच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यात टाकायचा?, असा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विचारला होता.

राज ठाकरेंच्या सभांनी भाजप चांगलंच अडचणीत आलं. त्यानंतर भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि राज ठाकरेंना भाजपने त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं. खोटं बोला पण रेटून बोला अशी राज ठाकरेंची पद्धत असल्याचं सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला . 

राज ठाकरेंनी त्यांच्या पूर्वीच्या भाषणांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली असल्याचे व्हीडिओ दाखवत भाजपने राज ठाकरेंवर पलटवार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. 

-राज ठाकरेंना मुख्यमंत्री नेमक काय म्हणाले? 

रात्रभर यु ट्युब बघत बसतात आणि मग ‘लाव रे तो व्हीडिओ’ करतात. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोलायला वक्ते राहिले नाहीत. म्हणून ते भाड्याने वक्ते घेत आहेत. 

राज ठाकरे या सर्व सभांमधून ‘लाव रे तो व्हीडिओ’ असं म्हणाल्याने चांगलेच चर्चेत आले आहेत. पण त्या चर्चा थांबवत भाजपने ‘आता तो बघाच व्हीडिओ, अब खुलेगा इसका ‘राज’, असं म्हणत भाजने राज ठाकरेंची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला.

राज ठाकरेंना त्यांच्या महाराष्ट्रातील सभांचा खर्च द्यावाचं लागणार आहे, असं वक्तव्य अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदेंनी वक्तव्य केलं आहे.