लेख

राज ठाकरेंच्या मनसेचं जहाज बुडायला सुरुवात झालीय का?

मनसेचं जहाज बुडायला सुरुवात झालीय का?, असा सवाल आता निर्माण झालाय. मनसेला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता आणखी 12 नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. जळगावच्या नगरसेवकांनी राज ठाकरेंची साथ सोडली आहे. 

शिवसेनाला रामराम करत राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली होती. मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी सुरुवातीच्या कालखंडात मराठी तरुणांना मोहिनी घातली. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता सुद्धा आली. महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट मांडल्यानंतर त्यांचं कौतुक देखील झालं. राज ठाकरेंचं इंजिन भरधाव सुटेल अशी आशा सगळ्यांना होती. 

काळ उलटत गेला आणि राज ठाकरेंच्या करिष्मा संपत गेला. राज ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडण्यास सुरुवात केली. राज्यातून त्यांच्या मागे असलेला तरुणांचा जनाधार देखील आटत गेला. नाशिक महापालिकेत मनसेला याचा मोठा धक्का बसला, नाशिकची सत्ता त्यांना गमवावी लागली. 

विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा अवघा एक आमदार निवडून आला. राज ठाकरे नव्हे तर हा आमदार स्वतःच्या ताकदीवर निवडूऩ आल्याची चर्चा यावेळी रंगली. मुंबई महापालिकेतही राज ठाकरे यांचे फक्त 7 नगरसेवक निवडून आले. मधल्या काळात अवधुत गुप्ते यांनी राज ठाकरे यांच्यासाठी ‘माझ्या राजाला साथ द्या’ गाणं तयार केलं. राज ठाकरेंनी साथ देण्याची विनंती केल्यामुळेच त्यांचे फक्त 7 नगरसेवक निवडून आल्याची चर्चा यावेळी जोरदार झाली. 

राज ठाकरेंना मुंबईकरांनी 7 नगरसेवक दिले खरे मात्र या नगरसेवकांना कालांतराने काय वाटलं कुणास ठावूक? 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठा राडा झाला. मात्र मनसेच्या हाती काहीच लागलं नाही. महापालिकेत काठावर असलेल्या शिवसेनेला मात्र या गोष्टीचा मोठा फायदा झाला. 

नुकतेच त्य़ांचे जुने सहकारी शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सोडून आपली सर्वात मोठी चूक झाल्याचं त्यांनी कबुल केलं. एका अर्थी राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय चुकला असंच त्यांनी म्हटलं. राम कदम, प्रवीण दरेकर यांच्या प्रमाणेच शिशिर शिंदे यांनी राज यांची साथ सोडल्याची या प्रकाराची खूपच चर्चा झाली. 

एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असतानाही राज ठाकरेंनी उमेद सोडली नाही. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे या शिवसेना कायम वापरणाऱ्या वाक्याप्रमाणे ते निश्चल राहिले. त्यांनी संघटनेला नवी उभारी देण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. नुकतीच त्यांनी आपल्या नव्या शिलेदारांची घोषणा केली. आता सर्व काही सुरळीत होईल असं वाटत होतं. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं की काय? जळगावात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. 12 नगरसेवकांनी मनसेची साथ सोडत सुरेश जैन यांच्या गटाशी हातमिळवणी केली आहे. 

उंदरांनी उड्या मारायला सुरुवात केली की जहाज बुडायला लागलंय असं समजावं, अशा अर्थाचा शब्दप्रयोग आपल्याकडे नेहमी केला जातो. मनसेच्या बाबत हा प्रकार सातत्याने घडत असतो. राज ठाकरेंसारखा खलाशी जहाज बुडून देण्याचा प्रयत्न करतोय, मात्र उंदरं सारखी उड्या टाकत आहेत. आता हे जहाज बुडणार की तरणार हे मात्र येणारा काळच सांगू शकतो.

IMPIMP