निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्यासाठी प्लॅस्टिक बंदी; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : निवडणुकीसाठी लागणारे पैसे गोळा करण्यासाठी राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले.

कोणतीही तयारी न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशात अशाप्रकारची बंदी आहे, मात्र त्याठिकाणी लोकांना सोई-सुविधा पुरवल्या जातात. महापालिका आणि राज्य सरकार जोपर्यंत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देत नाही तोपर्यंत लोकांनी दंड भरु नये, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी यावेळी केलं. 

प्लॅस्टिक बंदीचा निर्णय एका खात्याचा आहे की राज्य सरकारचा?, प्लॅस्टिक बंदीसारख्या महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का गप्प आहेत?, असे सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

प्लॅस्टिक बंदीच्या मुद्द्यावरुन रामदास कदम आणि राज ठाकरे यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. ठाकरे घराण्यात भांडणं लावण्याचं काम रामदास कदम यांनी करु नये, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.