महाराष्ट्र मुंबई

राम कदमांचा आणखी एक प्रताप; गोविंदांना दहीहंडी फोडू दिली नाही!

मुंबई : घाटकोपरचे भाजप आमदार आणि भाजप प्रवक्ते राम कदम यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. दहीहंडीपर्यंत पोहोचलेल्या गोविंदांना त्यांनी दहीहंडी फोडून दिली नाही. दहीहंडी फोडू नका असं संतप्त शब्दात सुनावत रचलेले थर गोविंदांना उतरवायला त्यांनी गोविंदांना भाग पाडलं. ‘थोडक्यात’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

अभिनेत्री प्राची देसाई घाटकोपरमधील राम कदम यांच्या दहीहंडी सोहळ्यासाठी उपस्थित होती. राम कदम तिच्यासोबत हास्यविनोद करण्यात मग्न होते. याचवेळी एक गोविंदा पथक थरावर थर रचत होतं. हे गोविंदा पथक दहीहंडीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलं. हे गोविंदा पथक दहीहंडी फोडणार तोच स्टेजवर उभ्या असलेल्या लोकांचं तिकडे लक्ष गेलं. त्यांनी हा प्रकार राम कदमांच्या निदर्शनास आणून दिला. 

राम कदमांचं या प्रकाराकडे लक्ष जाताच त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी अभिनेत्री प्राची देसाईच्या हातून माईक हिसकावून घेतला. या प्रकारानं प्राची देसाईसुद्धा काही काळ भांबावल्याचं दिसलं. स्टेजवरील लोकही अवाक् झाले होते. 

राम कदमांनी गोविंदांना थर खाली घेण्यास सांगितलं. मी सांगत नाही तोपर्यंत हंडी फोडायची नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा माईक प्राची देसाईच्या हातात दिला. या प्रकारामुळे सोशल मीडियावर राम कदमांना टीकेचा सामना करावा लागतोय. राम कदमांनी गोविंदांचा अपमान केला, असं काही जणांचं म्हणणं आहे.

दरम्यान, राम कदमांनी आणखी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्याचे पडसाद सध्या सोशल मीडियात उमटत आहेत. तुम्हाला पसंत असलेली मुलगी सांगा. त्या मुलीला पळवून आणीन आणि तुम्हाला देईन, असं त्यांनी म्हटलं आहे. 

व्हीडिओत पाहा काय घडलंय-

IMPIMP