सत्ता आहे तोपर्यंतच भाजपसोबत आहे; रामदास आठवलेंची जाहीर कबुली

मुंबई : राजकारणात संधीसाधूपणा केल्याशिवाय डाळ शिजत नाही. मात्र आपण संधीसाधूपणा करतो असं कोणताही नेता जाहीरपणे सांगत नाही. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मात्र याला अपवाद आहेत. ते आपल्या राहणीमानासाठी जसे ओळखले जातात तसेच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी देखील ओळखले जातात. त्यांना कुणाची पर्वा नसते जे मनात आले ते बोलण्याचा त्यांचा सिरस्ता असतो. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीत तसेच वादात देखील सापडले आहेत, मात्र त्यांना याची फिकीर नाही. हीच चूक पुन्हा करण्यात त्यांना काहीच वाटत नाही. सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेण्याचा त्यांचा गुण सगळ्यांनाच माहीत आहे. आताही त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे ज्याची खुमासदार चर्चा सुरु आहे. 

काय म्हणाले रामदास आठवले?

रामदास आठवले मुंबईतील एका जाहीर कार्यक्रमाला हजर होते. आठवले तसं रंजक बोलतात त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. तशी गर्दी मुंबईतही झाली होती. गर्दी पाहून बऱ्याचदा आठवलेंचा तोल ढासळतो आणि ते नको ते बोलून जातात. याही कार्यक्रमात तसंच झालं. रामदास आठवले जे म्हणाले ते ऐकून उपस्थितही अवाक् झाले. 

आमच्यासोबत (काँग्रेस) या असं काँग्रेसचे नसीम खान मला वारंवार सांगत आहेत. मी 10 ते 15 वर्षे त्यांच्यासोबत होतो. आता इकडेही मला 15-20 वर्षे राहावे लागणार आहे. जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत मी इथंच राहणार. त्यानंतर मी हवेचा अंदाज घेईल आणि कुठं जायचं ठरवेन- रामदास आठवले

कुणी केलं आठवलेंचं कौतुक तर कुणी केली टीका-

रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात एकच चर्चा सुरु झाली आहे. प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. कुणी रामदास आठवले यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहे तर कुणी याला लाळघोटेपणा म्हणत या वक्तव्यावर टीका करत आहे. रामदास आठवलेंच्या वक्तव्यावर व्यक्त होण्याचा मोह मात्र अनेकांना आवरता येत नाहीये. 

https://twitter.com/indiantweeter/status/1061123511161405440