महाराष्ट्र मुंबई

प्लॅस्टिक बंदीसंदर्भात राज्य सरकारकडून सर्वात मोठा निर्णय जाहीर

मुंबई : राज्य सरकारने राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयावर मोठी टीका झाली होती. अनेकांनी या निर्णयाचं कौतुक देखील केलं होतं. मात्र आता राज्य सरकारने या बंदी प्रकरणी एक मोठा निर्णय घेतला आहे. छोट्या दुकानदारांना दिलासा देण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. 

पाव किलोपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी छोट्या दुकानदारांना मुभा देण्यास आली आहे. उद्यापासून छोट्या दुकानदारांना हा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीबाबत एक पाऊल मागे टाकल्याचं दिसतंय. 

कुणाला होणार फायदा?-

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पाव किलोपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिक वापरता येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्वांनाच या नियमाचा फायदा मिळणार नाही तर फक्त छोट्या दुकानदारांसाठी हा नियम लागू आहे. दुकानातून वस्तू आणणाऱ्या नागरिकांचाही ताप यामुळे वाचणार आहे. 

सरकार टीकेचं धनी होण्याची शक्यता-

निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात आल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठी टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. बंदी घालायची तर सरसकट घाला. आधीच मोठ्या उद्योजकांना या बंदीतून वगळण्यात आलं होतं. आता छोट्या दुकानदारांना मुभा दिल्यास प्लॅस्टिक दैनंदिन वापरात येणारच आहे. त्यामुळे या बंदीचा फायदा काय? असा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. 

IMPIMP