प्रमुख पाहुणे म्हणून दानवेंना बोलवलं… अन् त्यांनी शिक्षकांचीच खरडपट्टी काढली!

भोकरदन | पराशर शिक्षक संस्थेने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी त्यांनी केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांना निमंत्रित केले होते. परंतू प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या दानवेंनी भर कार्यक्रमात शिक्षकांचीच खरडपट्टी काढली.

त्याचं झालं असं की… कार्यक्रमस्थळी आलेल्या शिक्षकांनी आपल्या दुचाकी अत्यंत बेशिस्तपणे लावल्या होत्या. त्या एवढ्या बेशिस्तपणे लावल्या होत्या की मंत्री महोदयांची गाडीसुद्धा प्रवेशद्वारातून आतमध्ये येऊ शकली नाही. मग दानवेंचा पारा चढला आणि त्यांनी तिथेच स्वागताला आलेल्या आयोजक, संचालक आणि शिक्षकांना फैलावर घेतले. त्यानंतर दानवे पायी चालत कार्यक्रमाच्या मंचावर गेले.

मग कार्यक्रम चालू झाला. पण रावसाहेब दानवेंचा राग आणखी गेलेला नव्हता. दानवेंनी भाषणात पुन्हा एकदा शिक्षकांना कानपिचक्या दिल्या. मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र शिक्षकच एवढे बेशिस्त वागत असतील तर मुलांना कशी शिस्त लावणार? असं म्हणत त्यांनी शिक्षकांचीच शाळा घेतली.

दानवेंनी एवढ्या कठोर शब्दात झापल्यानंतर वातावरण शांत झालं. पण ते वातावरण देखील दानवेंनीच आपल्या स्टाईलमध्ये हलकं केलं.

तुम्ही शिक्षक म्हणून सीमित राहू नका. गावात काय अडचणी आहेत? कुठल्या सुविधा हव्यात?? कुठल्या नकोत… ही गाऱ्हाणी माझ्याकडे मांडत चला… सरकार आपलं आहे… माझ्याकडे भरपूर निधी आहे… तुम्ही फक्त समस्या घेऊन माझ्याकडे या… असं म्हणत त्यांनी वातावरण हलकं केलं.

दरम्यान, रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. भाषणात अधून-मधून ते किस्से पेरत असतात आणि उपस्थितांमध्ये हस्याचे कारंजे उडवत असतात.