पुणे | भाजपने गेल्या 5 वर्षात विरोधी पक्षातल्या अनेक मातब्बर नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. किंबहुना ते नेतेही त्यांच्या जाळ्यात अडकले. लोकसभा निवडणुकीच्या काळात विखे, मोहिते, क्षीरसागर यांसारखे दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत आले.
साडे चार वर्षात जेवढी काही पक्षांतरं झाली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कार्यकाळात. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून तो अॅडव्हानटेजसुद्धा त्यांनाच जातो. अशातच पुण्यातल्या कार्यक्रमात विरोधी पक्षातल्या एका माजी महिला खासदारासोबत बोलणं झालंय. लवकरच ते भाजपात येतील किंबहुना त्यांना घेण्याची तयारी चालू आहे, असं वक्तव्य केंद्रिय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. अशातच दानवेंनी हे वक्तव्य करून विरोधी पक्षात बॉम्ब फोडला आहे. अगोदरच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला अनुकूल नसलेलं वातावरण आणि त्यात भाजप सरकारच्या कार्यकाळात न्यायालयाने लागू केलेलं मराठा आरक्षण यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांच्यात असलेली अस्वस्थता याचा फायदा भाजप घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातीये.
दरम्यान, विरोधी पक्षातले कोणते नेते भाजपच्या संपर्कात आहेत?? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुण्यातले कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले…
काँग्रेसला अध्यक्षसुद्धा मिळत नाही. काँग्रेसची स्थिती वाईट झाली आहे. मात्र भाजपला अच्छे दिन आले आहेत. मोदींची लोकप्रियता, अमित शहांची रणनिती आणि कार्यकर्त्यांचे कष्ट यामुळे आम्हाला ऐतिहासिक बहुमत मिळालं. दुसरीकडे काँग्रेसचे नेते रणांगण सोडून पळू लागले आहेत. चांगले दिवस असताना घरातले अध्यक्ष आणि पक्षाची दाणादाण उडलेली असताना दूसरा अध्यक्ष…! असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर शरसंधाण साधलं आहे.