मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

मुंबई | मी मंत्री झालो परंतु कुणी मला नामदार म्हणायला तयार नाही. कारण तसं वागणं जमतच नाही, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

काही वक्त्यांनी मी साधा-भोळा असल्याचं म्हटलं. यामध्ये किती खरे-खोटे हे तुम्हालाच माहीत नाही. जालना शहरातील एका बँकेत गेलो तर तेथेही माझा उल्लेख एवढा साधा-भोळा मंत्री पाहिला नाही, अशा शब्दांत करण्यात आला. मी माणसांच्या टकरा लावणारा माणूस पण लोक मला रेड्यांच्या टकरा लावण्याचे आमंत्रण देतात. यापेक्षा सोपा मंत्री कुठे सापडणार नाही, असं दानवेंनी यावेळी बोलताना म्हटलंय.

मी जळगावहून येत असताना जालना शहरातून एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने विचारलं, ‘कुठे आहात तुम्ही’, मी सांगितलं की, अजिंठा लेण्यांपर्यंत आलो आहे. समोरची व्यक्ती सांगत होती की, त्याचा सासरा रेल्वेने जालना येथे येत असून संबंधित रेल्वेगाडी तीन क्रमांकाच्या फलाटाऐवजी एक क्रमांकाच्या फलाटावर आणायला सांगा. आता मी काय रेल्वे चालकाला आवाज देऊन सांगू का. त्याचा मोबाइल फोन नंबर माझ्याजवळ असेल, असं दानवेंनी सांगितलं.

दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती भोकरदनला मला भेटायला आली आणि सांगू लागली की, साहेब, तुमच्यामुळे गाडी एक नंबरच्या फलाटावर आली आणि सासऱ्यासमोर माझी इज्जत वाचली, असं त्यांनी सांगितलं.

मीही म्हणालो, ‘काय सांगू गाडी चालवणारा ऐकतच नव्हता. मला काय त्रास झाला ते मलाच माहीत. पुन्हा अशी कामे नका सांगत जाऊ, असंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे आणि उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय, तसेच व्यापारी-उद्योजक, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, व्यक्तींच्या दिवाळी स्नेहमीलन-कार्यक्रमात दानवे बोलत होते.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या वतीने जालना शहराजवळ उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टचे उद्घाटन येत्या वर्षभरात होईल, अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

आपलं संबंधित मंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. ड्रायपोर्ट हाताळण्यासाठी चार-पाच कोटी रुपये गुंतवणूक करणाऱ्या एजन्सीची आवश्यकता आहे. परंतु आता हा खर्च जेएनपीटीच करणार असल्याचे दानवे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई