औरंगाबाद महाराष्ट्र

MIM मधून हकालपट्टी झालेल्या सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : सय्यद मतीन हे नाव राज्याच्या राजकारणात आता जवळपास साऱ्यांनाच परिचित झालं आहे. आपल्या वादग्रस्त वागण्यामुळे औरंगाबादचा सय्यद साऱ्या राज्याला माहीत झाला आहे. वंदे मातरम् आणि वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केल्यामुळे सय्यद मतीन कधीकाळी चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता एका वेगळ्याच कू-कृत्यामुळे सय्यद मतीन पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. बलात्काराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. अशाच एका बलात्कार प्रकरणी सय्यद मतीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अत्यंत गंभीर अशा घटनेची औरंगाबादमध्ये एकच चर्चा असून सय्यद मतीनच्या अडचणी चांगल्याच वाढण्याची शक्यता आहे. 

नेमका काय आहे हा प्रकार-

सय्यद मतीन औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक आहे. एमआयएम पक्षाच्या तिकीटावर तो निवडून आला आहे. त्याच्या प्रभागातील अनेक लोक त्याच्याकडे आपली कामं घेऊन येत असतात. नोकरीचे अमिष दाखवून अशाच एका महिलेला सय्यद मतीनने आपल्या जाळ्यात ओढले आणि तिचा गैरफायदा घेतला, असा आरोप आता सय्यद मतीनवर करण्यात आला आहे. राशिदपूरा भागात राहणाऱ्या पीडितेने स्वतः यासंदर्भात तक्रार दिली असून सय्यद मतीनने मला नोकरीचं आणि लग्नाचं अमिष दाखवलं, असं या महिलेचं म्हणणं आहे. औरंगाबादच्या सिटीचौक पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सय्यद मतीन आणि वाद हे समीकरणच-

सय्यद मतीन आणि वाद हे जणू काही समीकरणच झालं आहे. नुकताच वंदे मातरम् म्हणण्यावरुन देशभरात वादंग उभं राहिलं होतं. औरंगाबादमध्येही या घटनेचं लोण पोहोचलं होतं. सय्यद मतीनने यावेळी वंदे मातरम् म्हणण्यास विरोध दर्शवला होता. त्यावरुन मोठा वाद उभा राहिला होता. 

भाजपचे दिवंगत नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव औरंगाबाद महापालिकेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला सय्यद मतीनने विरोध दर्शवला होता. औरगाबाद महापालिकेत यानंतर मोठा राडा पहायला मिळाला होता. सय्यद मतिनला मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ जोरदार व्हायरल झाला होता. 

मतीनची एमआयएममधून हकालपट्टी-

सय्यद मतीन जरी एमआयएमच्या तिकीटावर निवडून आला असला तरी त्याने आपल्या वादग्रस्त वर्तनाने नेहमीच पक्षाला अडचणीत आणण्याचं काम केलं. त्याच्या या वर्तनामुळे हतबल झालेल्या एमआयएमने मतीनची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच त्याची एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, एमआयएममधून हकालपट्टी झाल्यानंतर मतीन आता नव्या पक्षाच्या शोधात आहे. मध्यंतरी तो समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.