शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसेशन; भाजपच्या राज्यमंत्र्याचा प्रताप

मुंबई : राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण एका आक्षेपार्ह फोटोमुळे चांगलेच गोत्यात आले आहेत. एका कार्यक्रमात व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून चव्हाण यांनी फोटोसेशन केलं आहे. त्यांचा हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढल्यामुळे रवींद्र चव्हाण यांना चांगलाच टीकेचा सामना करावा लागत आहे. 

उल्हासनगर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. यावेळी रवींद्र चव्हाण आणि अन्य नेत्यांनी व्यासपीठावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि अभिवादन केले. त्यानंतर फोटो काढत असताना रवींद्र चव्हाण यांना भान राहिले नाही. त्यांनी फोटो काढताना आपला हात चक्क शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर ठेवला. काही क्षणातच हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

रवींद्र चव्हाण यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. रवींद्र चव्हाण यांची आगामी काळात आणखी अडचण वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील अशाच प्रकारचा प्रकार केला होता. पालघर येथील सभेत त्यांनी पायातील पादत्राणे न काढताच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला होता. त्यानंतर मोठं वादंग उभं राहिलं होतं. 

अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदमने देखील शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्याची पदावरुन तसेच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता छिंदम पुन्हा राजकारणात सक्रीय होताना दिसतोय. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण प्रकरणी भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.